पुणे : वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात समान संधी प्राप्त होण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) काही उपायांची शिफारस केली आहे. जोड अभ्यासक्रम, कमवा आणि शिका योजना, घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी समान संधी कक्ष असे काही उपाय त्यात प्रस्तावित करण्यात आले आहेत.
उच्च शिक्षण संस्थांमध्ये योग्य वातावरण, वागणूक न मिळण्यासह शैक्षणिक ताणामुळे वंचित घटकांतील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील गळती होत असल्याचे आतापर्यंत अनेक अभ्यासांतून दिसून आले. त्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग (नॉन क्रिमिलेअर), अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये सर्वसमावेशक, समान आणि संवेदनशील वातावरण तयार होण्यासाठी यूजीसीने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणेच वंचित घटकांतील विद्यार्थ्यांनाही समान संधी मिळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




