प्रमोद जठार हे भाजपची मुलुख मैदान तोफ : निलेश राणे

133

कणकवली | मयुर ठाकूर : रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याची भाजपा पक्षाची मुलूख मैदान तोफ समजले जाणारे माजी आमदार. प्रमोद जठार यांच्या वाढदिवसानिमित्ताने कासार्डे येथील त्यांच्या निवासस्थानी प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने माजी. आमदार प्रमोद जठार यांचा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी भेट देऊन माजी आमदार प्रमोद जठार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आ. विनय नातू, माजी आमदार अजित गोगटे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी ,उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, संचालिका प्रज्ञा ढवण, डॉ. मिलींद कुलकर्णी, उद्योजक विशाल परब, श्री. दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, राजन तेली यांनी सुद्धा प्रत्यक्ष भेटून प्रमोद जठार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान शुभेच्छा देताना भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे म्हणाले, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे हे २०२३ मध्ये खरं वाटतयं. जठार साहेबांच आणि माझं कपाळ कुठेतरी घासलेलं होतं. कारण २००९ मध्ये जठार साहेब आमदार म्हणून निवडून आले आणि निलेश राणे खासदार म्हणून निवडून आले होते. २०१४ मध्ये दोघांचीही विकेट पडली. ही विकेट ‘हिट विकेट’ न होता पुन्हा पिचवर येऊन स्वत:ची ओळख निर्माण करण्याची होती. जठार साहेबांचा आणि आमचा संपर्क कधीही नव्हता.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आल्यावर तसेच भाजपा पक्षात २०१९ पासून जी काही वर्षे अनुभवता आली त्यातील आवडणारा माणूस म्हणजे मा.आ. प्रमोद जठार होय.

ज्या विषयात कोण जात नाही त्याठिकाणी जठार जातात. प्रमोद यांना आपण माणूस म्हणून सांभाळायला पाहिजे. रिफायनरीला लोक विसरले होते. पण प्रमोद जठार यांच्या सोबत कोण असले – नसले तरी माघार न घेता पुन्हा – पुन्हा पाठपुरावा करून हातातून न घालवता माझ्या कोकणातील माणसाला नोकऱ्या मिळणार नाही हे जे दु:ख त्यांच्या मनात होते ते कुठेतरी कोकणवासियांच्या भल्यासाठी होते. रिफायनरी जेव्हा उभी राहिल तेव्हा पहिला ‘सॅल्युट’ फक्त जठार यांना असेल असे गौरोद्गार भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे श्री. जठार यांच्या वाढदिवसाच्या भाषणावेळी काढले.

‘भारत माता कि… जय’ काँग्रेसमध्ये कोणच म्हणत नाही : निलेश राणे

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांचे भाषण सुरू असताना तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांकडून ‘भारत माता कि… जय’अशा घोषणा देण्यात आल्या. दरम्यान बोलताना निलेश राणे म्हणाले की, भाजपा पक्षात खरोखरच वेगळे संस्कार आहेत.‘भारत माता कि जय’ काँग्रेसमध्ये कोणच म्हणत नाही. त्यांचकाही भलतचं सुरू असते.

निलेश राणे यांच्या प्रमोद जठारांना अनोख्या शुभेच्छा !

प्रमोद जठार हे आता लोकसभेचा प्रवास करत आहेत त्यांना आमच्या शुभेच्छा. प्रमोद जठार यांना या दरम्यान जी काही आमची मदत लागेल ती अगदी चिपळूणच्या टोकापर्यंत करायची आमची मनापासून इच्छा आहे. लोकसभेसह तिनही आमदारकीच्या निवडणुकांमध्ये गुलाल उडाला तर तो आमचाच उडणार. आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत. अशा शब्दात भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी प्रमोद जठार यांना शुभेच्छा दिल्या.