शिर्डी : सिन्नर – शिर्डी महामार्गावर खासगी बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झालाय. सिन्नर तालुक्यातील पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी मार्गावरील पहाटेच्या 6 च्या सुमारास खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला आहे तर 10 जणांचा मृत्यू देखील झाला आहे. या अपघातात दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. या बसमध्ये 45 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील वीस प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सिन्नर तसेच शिर्डी येथील सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

मालवाहतूक ट्रक शिर्डीहून सिन्नरच्या दिशेने जात होता. तर बस ही सिन्नरच्या दिशेन येत होती. पाथरे या गावाजवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात साधारण 35 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. मात्र आता पोलीस आणि बचावपथकाच्या माध्यमातून ही वाहतूक सुरळीत केली.

मुख्यमंत्र्यांनी अपघाताच्या चौकशीचे दिले निर्देश
या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.





