कणकवलीत पुन्हा एकदा हायवे प्राधिकरण ओव्हरब्रिज खालील स्टॉलवर कारवाई करणार ..?

98

पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्याची सूत्रांची माहिती | मागील कारवाईतून निष्पन्न काय ?

सर्वसामान्य जनतेमधून संतप्त प्रश्न होतोय उपस्थित.!

कणकवली | मयुर ठाकूर : मुंबई – गोवा महामार्गवर कणकवली तालुक्यातील ओव्हर ब्रिजखाली असलेल्या स्टॉलवर हायवे प्राधिकरणाने पोलीस बंदोबस्ताचा वापर करत कारवाई केली होती. मात्र दोन दिवसानंतर पुन्हा ओव्हरब्रिज खाली मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारले असल्याचे चित्र हे दिसत होते. मात्र प्रशासनाला किंवा हायवे प्राधिकरणाला देखील एक प्रश्न केला जातोय की जर स्टॉल लावण्यासाठी किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी परवानगी नसेल तर ओव्हरब्रिजखाली इतर काही प्रकल्प जे सुरू आहेत ते नेमके कोणाच्या आशीर्वादाने ? आणि ही भूमिका एकेरीच का ? तसेच कारवाई फक्त स्टॉल धारकांवर का ? असेही काही प्रश्न उपस्थित होत आहेत.

हायवे प्राधिकरणाने मागितला पुन्हा एकदा पोलीस बंदोबस्त ; सूत्रांची माहिती

… तर पुन्हा एकदा हायवे प्राधिकरणाने पोलीस बंदोबस्त मागितला असल्याची माहिती यंत्रणेतील काही खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान आधी या समस्येवर तोडगा कोणत्या पद्धतीने काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रानी मागितली. परंतु, हायवे प्राधिकरणाने अद्याप कोणत्याही पद्धतीचे उत्तर न दिल्याने तात्काळ बंदोबस्त देणे शक्य नसल्याचे देखील पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत दोन्ही बाजूंची पडताळणी करून पाहणे गरजेचे आहे. मात्र एकेरी भूमिका घेऊन कोणत्याही पद्धतीने स्टॉल धारकांना देखील त्रास होणार नाही याची खबरदारी देखील यंत्रणेकडून घेण्यात आली आहे. तसेच हायवे प्राधिकारक उठ – सुठ करत असलेली स्टॉल धारकांवर कारवाई ही योग्य आहे की अयोग्य ? यामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी पडताळून पहावे, अशा प्रतिक्रिया स्टॉल धारकांकडून उमटत आहेत.