मालवण : कट्टा मालवण येथील दीपक वामन येंडे यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या गणेश कृष्णा गावडे, अनाजी उर्फ बबरी कृष्णा गावडे दोघे रा. चौके मालवण व मारुती भिवा खांडेकर रा. कसाल यांना अटक करून मालवण पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी मालवण न्यायालयाने तीनही संशयित आरोपींना १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. तीनही संशयित आरोपींना पोलीस कोठडी मुदत संपल्यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता तीनही संशयित आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी संशयित आरोपींच्या वतीने ऍड. स्वरुप पई व ऍड ल. अंबरीश गावडे यांनी काम पाहिले.
चौके- कसाल मार्गावर चौके माळरानावर शनिवारी मध्यरात्री काही व्यक्तींनी केलेल्या मारहाणीत दीपक वामन येंडे (वय ५६) रा. कट्टा बस स्टॅण्ड मागे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस अधिक तपास करत होते.
या प्रकरणी तीन संशयितांना मालवण पोलिसांनी ताब्यात घेत अटक केले होते. त्यांना पोलीस कोठडी मुदत संपल्यावर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.





