बांदा : येथील आनंदी मंगल कार्यालय येथे डॉ. शंकर मोडक प्रतिष्ठान बांदा यांच्यातर्फे एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय मार्गदर्शन मोफत शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी अटल प्रतिष्ठान सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर होते. तर प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब, गोव्याचे माजी शिक्षणाधिकारी माधव जोशी,शिवा तोरसकर, बांदेकर आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य धोपेश्वरकर, प्रा. तुकाराम मोरजकर, आरबीआयचे सेवानिवृत्त अधिकारीनारायण मणेरीकर, सीए चंद्रकांत सावंत, सुरेश गवस, एसबीआयचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश म्हाडगुत, मानसशास्त्रज्ञ डॉ. चिन्मयी नाईक, भोसला सैनिक स्कूल नाशिकचे सेवानिवृत्त अधीक्षक किशोर केसरकर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. रुपेश पाटील, माजी प्राचार्य अन्वर खान, माजी पर्यवेक्षक अच्युत पिळणकर, अजित शिरोडकर आदी उपस्थित होते.
पत्रकारांचाही सत्कार…
दरम्यान कार्यक्रमास उपस्थित असलेले तसेच बांधा पंचक्रोशीत पत्रकारितेत विशेष योगदान देणाऱ्या पत्रकार बांधवांचेही सत्कार करण्यात आले यात महाराष्ट्र माझाच्या प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत सकाळचे बांदा प्रतिनिधी निलेश मिरजकर यांसह इतरही पत्रकार बांधवांचा सस्नेह सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
दिवसभरात विविध विषयांवर मार्गदर्शन-
या एकदिवसीय व्यक्तिमत्व विकास व व्यवसाय मार्गदर्शन मोफत शिबिरात विविध मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थी व पालक वर्गाला बँक क्षेत्रातील करिअरच्या संधी स्पर्धा परीक्षा व त्यांची तयारी वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या संधी जाहिरात व कला क्षेत्रातील विविध संधी तसेच स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी या सोबतच मुलाखत तंत्र देहबोली व व्यक्तिमत्व विकास अशा विविध क्षेत्रातील माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त मुख्याध्यापक अन्वर खान यांनी केले तर उपस्थितांचे आभार सेवानिवृत्त माजी पर्यवेक्षक अच्युत पिळणकर यांनी केले.
‘स्वर संध्या’ संगीत मैफीलीतून रंगत
दरम्यान सायंकाळच्या शेवटच्या सत्रात डॉ. शंकर मोडक प्रतिष्ठान आयोजित,
श्री. सदगुरू संगीत विद्यालय, सावंतवाडी, प्रस्तुत
‘स्वरसंध्या’ हा हिंदी, मराठी गीतांचा सदाबहार नजराणा पेश केला गेला. यात गायिका ॲड. सिद्धी परब, केतकी सावंत, नितीन धामापूरकर यांनी आपल्या बहारदार सुरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना संगीत साथ हार्मोनियमवर निलेश मेस्त्री, कीबोर्ड कु. मंगेश मेस्त्री, तबला किशोर सावंत, ऑक्टोपॅड आश्विन जाधव यांनी दिली. या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय कात्रे यांनी केले.





