कणकवली फोंडा चेकपोस्टवरही घडली अशीच घटना…
कणकवली : बेकायदेशीर रित्या कत्तलीसाठी जाणारा जनावरांच्या वाहतुक करणार्या टेम्पोस फोंडाघाट चेक पोस्ट येथे पहाटे ३.३५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी रोखले. या टेम्पोतील बारा जनावरांसह टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी चालक आसिफ महंमद इसाक सिराज (३५ रा. कोल्हापूर-आजरा) व टेम्पोमालक उस्मान उर्फ ताहीर मुनाफ जमादार (२५ रा. कोल्हापूर-नेसरी) व क्लीनर हुजेफा शकील सिराज (२१, रा. कोल्हापूर आजरा) यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार फोंडाघाट चेक पोस्टवर कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल मारुती बाळू बारड यांनी दिली आहे. मारुती बारड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, लोरे फाटा येथे ए. एस. के कंपनीचे सिक्युरिटी प्रविण विश्वास पडेलकर यांना एका टेम्पोचा संशय आल्याने त्यांनी त्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतू तो टेम्पो तिथे न थांबता फोंडाघाट चेक पोस्टच्या दिशेने जात होता. त्यानंतर प्रवीण पडेलकर यांनी फोंडाघाट चेकपोस्टवर कार्यरत असलेले पोलीस मारुती बारड यांना याबाबतची माहिती दिली.
त्यानंतर त्यांनी फोंडाघाट चेक पोस्ट येथे टेम्पो अडवला असता त्या टेम्पोमध्ये दाटीवाटीने ४ बैल, ५ गायी, १ वासरु आणि २ म्हशी अशी १२ जनावरे भरलेली असल्याचे आढळून आले. जनावरे कुठे नेत असल्याचे टेम्पो मालकास विचारणा केली असता कोर्ले ता. देवगड येथून जनावर खरेदी करून कत्तलसाठी नेत असल्याचं त्याने सांगितले. असे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी या सर्व जनावरांना कुडाळ येथे पाठविले आहे. पोलिसांनी गुरांची बेकायदेशीर वाहतूक करणारे टेम्पो चालक-मालक व क्लीनर यांच्यासह टेम्पो ताब्यात घेतला आहे.





