देवगड | स्वप्नील लोके | जिवनाच्या आयुष्याची पाने चाळत असताना आमची चिमुरडी मुलं कधी मोठी झाली समजलं नाही. वाटलं होतं, लहानपणी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली ही देवाघरची फुलं तीचं आमची मुलं उतार वयात आपल्या आयुष्याचा आधारवड बनतील. अशी स्वप्न पाहिली होती मुलांची लग्नगाठ बांधून जबाबदारी सोपविली. आता उतारवयात विसावा घ्यायचा या निर्णयावर आम्ही पोहोचलो होतो

वयाच्या साठीची उमेद संपल्यामुळे पूर्वीप्रमाणे आमच्याकडून कामांची वजाबाकी होत नसल्याने फक्त घरात बसून दिवस ढकलत होतो.पण काही कामधंदा न करता घरात बसल्याने आम्ही आमच्याच मुलांना जड झालो की काय ? असं वाटू लागलेय. ज्या घराशी आयुष्याची नाळ जुळली ज्या ठिकाणी मुलांना मोठी केली मोठी झाल्यावर तीच मुले तुम्हाला काही समजत नाही असं टोचून बोलायला लागतात तेव्हा क्षणार्धात काळीज कापून गेल्यासारखे वाटते.मुलांनी सुनांनी टोचून बोलणे आणि मारलेले टोमणे ऐकून मन खचून जातं.तेव्हा परमेश्वराला सांगावंस वाटतं बाबा पुरे रे आता ने आम्हाला, काय चाललंय ते ऐकवत पण नाही आणि पहावत पण नाही रे.

आजकाल भरपूर लक्ष्मी दर्शनाच्या नादात उद्योग धंद्याच्या मोहात आपल्याच मुलांनी सीमा मर्यादाच ओलांडली. उत्तर वयात आम्हाला प्रेम माया देण्याऐवजी हिचं मुलं आमची रवानगी त्या वृद्धाश्रमात करतात ना तेव्हा सारं काही अडगळीत पडून संपल्यावर सारखं वाटतं. मुल पहायला वेळ नाही म्हणून वृद्धाश्रमात आमची भरती करतात .पण आपल्या ज्या मुलांनी आम्हांला वृद्धाश्रमात पाठवलं तेच वृद्धाश्रम म्हणजे आता आमचं हक्काचं मायेचे मंदिर आहे.
वाटलं होतं उतार वयात कधीतरी तीर्थक्षेत्रांना भेटी द्याव्यात. पर्यटन स्थळांना भेटी द्याव्यात. पण हे स्वप्न कधी पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. पण एक दिवस असा आला की, या मंदिरातून बाहेर पडून मनात साठवून ठेवलेलं तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचं स्वप्न कसं साकार झाला हे आम्हाला कळलंच नाही.

निमित्त मात्र होतं कोकणी जनतेच्या आशिवादाने दिल्लीच्या गादीवर विराजमान झालेल्या कोकणच्या विशेषत: सिंधुदुर्गच्या सुपुत्राचे. अर्थात केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे. देवगड जामसंडे शहर भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माणुसकीचे देवदर्शन व पर्यटन सहल या उपक्रमाचे.
या उपक्रमामुळे आम्हाला श्री दिर्बादेवी मंदिर जामसंडे, वॅक्स म्युझियम, देवगड पवनचक्की गार्डन, देवगड किल्ला गणपती मंदिर,कुणकेश्वर मंदिर आदी मंदिरे,पर्यटन स्थळे आम्हाला या देवगड जामसंडे शहर भाजपाने राबवलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे पाहता आली. नुसती पर्यटन स्थळ दाखवलीच नाही तर आमच्या दिविजा मंदिरापासून आणण्यापासून ते पुन्हा आम्हाला दीविजा मंदिरात सुखरूप पोचविण्यापर्यंत सर्व व्यवस्था आणि प्रत्येकाची काळजी या मंडळींनी घेतली, या उपक्रमाच्या माध्यमातून देवगड जामसंडे शहरातील या मुलांनी आमच्या मनात घर केलेय. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे व आमदार नितेश राणे यांचे विशेष आभार मानत आयोजक देवगड जामसंडे शहर भाजपाला खास आशीर्वादरुपी धन्यवाद दिले.





