कणकवली : कणकवली एसटी स्थानकाची नव्याने निर्मिती व्हावी अशी सातत्याने मागणी करून सुद्धा गेल्या दोन परिवहन मंत्र्यांनी ते काम केलेले नाही. राणे विरोध म्हणून कणकवली एसटी स्थानक दुरुस्ती केलेले नाही. मात्र नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात माझ्या विनंतीला मान देऊन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणकवली एसटी बस स्थानक बीओटी तत्त्वावर विकसित करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे हे एसटीचे बस स्थानक सुसज्ज आणि सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असे उभे केले जाणार आहे.अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली.

तोपर्यंत प्रवाशांना रोजचे भेडसावणारे प्रश्न आज पाहणी दरम्यान निकाली काढण्याच्या सूचना एसटी विभाग नियंत्रकांना दिलेल्या आहेत. असेही त्यांनी सांगितले. तर बस स्थानकातील शौचालय, बैठक व्यवस्थेतील दुरुस्ती, पंख्यांची उपलब्धता, सांडपाण्याचा निचरा आणि परिसर स्वच्छता तातडीने करून घेण्याच्या सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना कणकवली एसटी स्थानक फिरून पाहणी करून दिल्या. दरम्यान कणकवली एसटी बस स्थानकाला भेट देवून आ. नितेश राणे यांनी पाहाणी केली.

यावेळी एसटी चे विभाग नियंत्रक अभिजित पाटील, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेता संजय कामतेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक बंड्या गांगण, सुशील पारकर, नगरसेवक विराज भोसले, प्रवासी संघटनेचे अशोक करंबेळकर, संतोष काकडे आदी उपस्थित होते.
प्रवाशांचे रोजचे प्रश्न महत्वाचे आहेत. ते आपण आज जाणून घेतलेले आहेत. यातच एसटी बस स्थानकामधील डांबरीकरण गेले कित्येक वर्ष केलेले नाही, हे लक्षात आले आहे. त्यामुळे बस स्थानकात धूळ, खड्डे याचा त्रास प्रवाशांना होतो. यासाठी काँक्रिटीकरणाचा जो प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आलेला आहे तो मंजूर करून घेण्यासाठी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेऊन त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे यावेळी आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
सावंतवाडी प्रमाणेच कणकवली, देवगड, विजयदुर्ग, वैभववाडी या एसटी डेपो मध्ये मिनी बस शासनाकडून प्राप्त होणार आहेत. त्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग पर्यटनासाठी मिनी बस संकल्पना राबविणार
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा आहे या ठिकाणी उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही पर्यटकांना पाहण्या सारखी अनेक स्थळे आहेत. या स्थळांवर पोहोचण्यासाठी मिनीबस संकल्पना राबविण्याचा आपला माणूस आहे.
त्याची प्राथमिक चर्चाही आज आपण केली.मिनीबस च्या माध्यमातून पर्यटक एकाच वेळी पर्यटन स्थळांना भेटी देऊन परत येतील आणि ही संकल्पना एसटीच्या महसुलात भर घालणारी त्याचप्रमाणे पर्यटन वाढवणारी आहे. नव्याने मिनीबस प्राप्त होताच ही संकल्पना युद्धपातळीवर राबवण्यात येणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.





