वागदे सरपंच संदीप सावंत यांच्या इशाऱ्यानंतर | वागदे येथील हायवेचे रखडलेले प्रलंबित काम सुरू

111

कणकवली : मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत गेले कणकवली नजिक वागदे मधील उभादेव समोरील घाडीगावकर कुटुंबीयांच्या जमिनीतील हायवेचा काही भाग डांबरीकरण करायचा राहिला होता. वागदे सरपंच संदीप सावंत यांनी याबाबत अनेकदा आम.नितेश राणे यांचे लक्ष देखील वेधले होते. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांना सूचना देऊन अखेर डांबरीकरण राहिलेले काम हाती घेण्यात आले.

या अर्धवट असलेल्या रस्त्याच्या कामामुळे या भागात धुळीचे वातावरण पसरून वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. तर सातत्याने या ठिकाणी असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे अपघात देखील होत होते. काही महिन्यांपूर्वीच हळवल फाटा येथे अपघात झाल्यानंतर या ठिकाणी एकाचा मृत्यू झाला होता. हळवल फाटा ते नाईक पेट्रोल पंपापर्यंत एकेरी मार्गावरूनच दुहेरी वाहतूक सुरू होती. मात्र या प्रश्नी सातत्याने पाठपुरावा करून घाडीगावकर कुटुंबीयांना जमिनीचा मोबदला मिळाल्यानंतर उभादेव समोरील रस्त्याचा भाग खुला करण्यात आला. परंतु हा भाग डांबरीकरण करायचा शिल्लक राहिला होता. त्यानंतर आज याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली. वागदे सरपंच संदीप सावंत यांनी या कामा संदर्भात पाहणी केली व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागल्याबद्दल समाधान देखील व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत वागदे ग्रामस्थ उपस्थित होते.