कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने आज शनिवारी १८ मार्च २०२३ रोजी सकाळी सहा वाजता निधन झाल. ते मृत्यूसमयी ८८ वर्षाचे होते. पाच दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतला एक बुजुर्ग कलावंत काळाच्या पडद्याआड गेला. दुपारी बारा वाजता पंचगंगा स्मशानभूमी इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भालचंद्र कुलकर्णी यांची चरित्र अभिनेते म्हणून ओळख होती. त्यांनी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. मराठीतील ख्यातनाम दिग्दर्शक व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणे, विजय कोंडके यांच्यापासून ते महेश कोठारे यांच्यासारख्या निर्माता- दिग्दर्शकासोबत काम केल होते . १९६५ मध्ये शेरास सव्वाशेर या सिनेमातून त्यांच्या चित्रपटातील कारकीर्दला सुरुवात झाली. “पिंजरा, असला नवरा नको ग बाई, मुंबईचा फौजदार, सोंगाड्या, एक गाव बारा भानगडी, सुगंधी कट्टा , करावे तसे भरावे, चंदनाची चोळी अंग अंग जाळी, थरथराट, खतरनाक, धुमधडाका यासह ३०० हून अधिक सिनेमात भूूमिका साकारल्या होत्या.
गाजलेल्या माहेरची साडी या सिनेमातील भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. २९ जुलै १९३५ रोजी त्यांचा जन्म झाला होता. भालचंद्र कुलकर्णी हे शिक्षक होते. प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या शाळेत त्यांनी जवळपास ३५ वर्षे नोकरी केली. शिक्षक ते चरित्र अभिनेता यावर आधारित “मी एक शिक्षक – एक विदूषक” या नाटकाचे नाट्यप्रयोग केले होते.
भालचंद्र कुलकर्णी यांना नाटकाची आवड होती. त्यांनी स्वतःची मधु थिएटर्स या नावान नाट्य संस्था काढली होती. जवळपास पंधरा वर्षे त्या संस्थेच काम सुरू होत. त्यांनी लोकनाट्यात काम केली.
त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळान त्यांना चित्रभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केल होते. भालचंद्र कुलकर्णी यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक म्हणून काम केल. महामंडळाच्या सचिवपदाची जबाबदारी पार पडली होती. जयप्रभा स्टुडिओ व शालिनी सिनेटोन वाचवण्यासाठी कोल्हापुरात झालेल्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता.





