सरकारी लाभांसाठी ‘यूडीआयडी’ कार्ड | १ एप्रिल पासून स्वतःजवळ बाळगणे दिव्यांगांना सक्तीचे

88

ब्युरो न्युज : केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुण्यासह देशभरातील दिव्यांगांना येत्या एक एप्रिलपासून ‘युनिक डिसेबिलिटी ‘आयडेंटिफिकेशन कार्ड’ (यूडीआयडी) बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या धर्तीवर राज्य सरकारकडूनही दिव्यांगांना ‘यूडीआयडी कार्ड’ अनिवार्य करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने दिव्यांगांना ‘यूडीआयडी’ कार्ड अनिवार्य केले आहे. दिव्यांग व्यक्तींच्या ओळख पडताळणीसाठी ‘यूडीआयडी’ कार्ड हा एकमेव दस्तावेज ठरणार असून, दिव्यांगत्व सिद्ध करण्यासाठी विविध कागदपत्रे बाळगण्याची गरज भासणार नाही.”यूडीआयडी’ कार्डामुळे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व पात्र ठरणार आहेत. त्यामुळे सर्व दिव्यांग व्यक्तींनी ‘यूडीआयडी’ संकेतस्थळावर नोंदणी करून आपले कार्ड काढून घ्यावे,’ असे आवाहन दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे उप आयुक्त संजय कदम यांनी केले आहे.

असे मिळेल यूडीआयडी कार्ड –

● केंद्र सरकारच्या www.swavlamban- card.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

● वैयक्तिक तपशील भरावेत. आधार क्रमांकाचा उल्लेख करावा.

● दिव्यांगत्वाचा प्रकार निवडावा. बहुदिव्यांगत्व असल्यास नमूद करावे.

● आपल्या पत्त्याच्या जवळचे एक रुग्णालय निवडावे.

● दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार रुग्णाला तज्ज्ञ पाठविले जाते. तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली जाते.

● त्यानंतर दिव्यांगांना ‘यूडीआयडी’ कार्ड, प्रमाणपत्र दिले जाते.

सव्वादोन लाखांहून अधिक अर्ज प्रलंबित –

राज्यात ‘यूडीआयडी’ कार्ड आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी १३ लाख ७८ हजार ५१७ अर्ज आले आहेत. आतापर्यंत आठ लाख ९५ हजार दिव्यांगांना ‘यूडीआयडी’ प्रमाणपत्र देण्यात आले असून, सव्वादोन लाखांहून अधिक दिव्यांगांचे अर्ज प्रलंबित आहेत. दोन लाख ४८ हजार ४७२ अर्ज नाकारण्यात आले आहेत, अशी माहिती दिव्यांग कल्याण आयुक्तालयातर्फे देण्यात आली.