मालवण : आमदार वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच शिवसेनेचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, मंत्री दीपक केसरकर व मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आमच्या नेत्यांवर टीका करण्याची त्यांची ऐपत नाही. असा टोला शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी मालवण येथील पत्रकार परिषदेत लगावला.
सागरी मार्ग येथील हॉटेल रामेश्वर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, तालुकाप्रमुख महेश राणे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, महिला तालुकाप्रमुख रिया आचरेकर, गीता नेवाळे, उपतालुकाप्रमुख पराग खोत, अरुण तोडणकर, महिला उपतालुकाप्रमुख भारती घारकर, शबनम शेख, शहरप्रमुख बाळू नाटेकर, महिला शहरप्रमुख लुईदीन फर्नांडिस, हडी महिला विभाग प्रमुख शिल्पा तोंडवळकर, उपविभाग प्रमुख शाहीन शेख, राजा तोंडवळकर आदी उपस्थित होते.
गावकर म्हणाले, शिवसेनेचे नवनियुक्त लोकसभा मतदार संघ संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्यावर आमदार नाईक टीका करत आहेत. मात्र फाटक यांच्या ताकदीची त्यांना कल्पना नाही. माजी आरोग्य मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागे रवींद्र फाटक यांचीच कामगिरी आहे. त्यामुळेच फाटक हे असेच आणखी प्रवेश घेत राहतील या भीतीने आमदार नाईक वैफल्यग्रस्त झाले आहेत.
विकास निधी आपण आणल्याचा दावा आमदार नाईक करत आहेत. मात्र हा निधी त्यांनी आणला नसून तो मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केला आहे. आमदार नाईक व खासदार विनायक राऊत यांच्यात काय चालू आहे हे सर्वश्रुत आहे. खासदार आपल्या बॅनर मध्ये वैभव नाईक यांना स्थान देत नाहीत हे सर्वांनी पाहिले. असा टोलाही गावकर यांनी लगावला.
तौक्ते वादळ काळात तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरविलेल्या मदती मधूनच नाईक यांनी वादळग्रस्ताना मदत केली. त्यामुळे नाईक यांचे स्वतःचे कर्तृत्व काय हे आम्हाला माहित आहे. मंत्री केसरकर व मंत्री सामंत यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार नाईक यांची त्यांच्यापर्यंत पोहचण्याची ऐपत नाही. विकासकामाची गती नाही.





