Home Uncategorized चिरे वाहतूक करणारा ट्रक कोसळला | चालक जागीच ठार

चिरे वाहतूक करणारा ट्रक कोसळला | चालक जागीच ठार

115

आंबोली : आंबोली घाटात मुख्य दरडीच्या ठिकाणी चिरे वाहतुक करणारा ट्रक दिड हजार फूट खोल दरीत कोसळून चालक शंकर मनोहर पाटील (वय २८ रा. नंदगड जि. बेळगांव ) याचा जागीच मृत्यु झाला. रवीवारी पहाटे ही घटना घडली. या बाबतची माहीती घाटात दरडीसाठी जाळी लावणाऱ्या कामगारांनी रवीवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीसांना दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

मयत ट्रकचालक शंकर मनोहर पाटील हा बसू नाईक यांच्या मालकीच्या ट्रकने नेहमीच मालवण ते बेळगांव असे चिरे वाहतुक करीत असे. नेहमी प्रमाणे शनिवारी रात्री मालवण येथून चिरे भरून रात्रौ ऊशीरा मालवण येथून निघाला होता. रवीवारी पहाटेच्या सुमारास आंबोली घाटात आला असताना गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक सरळ दरीत कोसळला. ट्रक पडल्यानंतर वरच्या भागातून थोडाफार दिसत असल्यामुळे माहीती मिळाली. अपघानानंतर चिरे खाली कोसळले. याच चिऱ्यांच्या खाली दबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

आंबोली घाटात धोकादायक दरडींच्या ठिकाणी जाळी लावण्याचे काम गेले महीना भर सुरु असून त्या निमित्ताने हे कामगार आंबोली येथून दररोज घाटात ये जा करीत असतात. त्यामुळे त्यांना हा रस्ता व संरक्षक कटडे माहीत झाले आहेत . सोमवारी सकाळी हे कामगार कामावर येत असताना त्यांना मुख्य दरडीच्या खाली आंबोली पासून सावंतवाडीच्या दिशेने सुमारे साडेचार कि.मी. अंतरावर घाटाच्या बाजुने कटडा तुटलेला दिसला त्यामुळे त्यांनी खाली वाकून पाहीले तर त्यांना ट्रक खाली दिसला. त्यांनी लागलीच याबाबतची माहिती आंबोली पोलीस दूरक्षेत्रचे ठाणे अंमलदार हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई यांना सांगितली.

यावेळी देसाई यांनी त्वरीत आपले सहकारी पो. कॉ. राजेश नाईक यांना घेऊन घटना स्थळी जाऊन खात्री केली. आणि वरीष्ठांना संबधीत घटनेची माहीती दिली. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीम व सांगेली येथील बाबल आल्मेडा टीमने संयुक्त मोहीम राबवित सदर चालकाचा मृतदेह बाहेर काढला. आंबोली बचाव पथक ,दीपक मेस्त्री,दीपक नाटलेकर,ओंकार कळसुलकर,प्रथमेश गावडे, सागर ढोकरे,वामन पालेकर तसेच सांगेली येथील बाबल आल्मेडा टीम यांनी मदतकार्यात सहभागी झाले. त्यांनतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आला. याबाबत सावंतवाडी पोलिसात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.