कणकवली : तालुक्यातील नाटळ गावच्या हद्दीतील गडनदीच्या कुर्ला – खटारा नदी पात्रात एका झाडाच्या फांदीला लटकलेल्या अवस्थेत सडलेल्या स्थितीत एका अज्ञात वृद्धाचा मृतदेह गुरवारी आढळून आला. वीस – पंचवीस दिवसापूर्वी तो मयत झाला असावा असा अंदाज मृतदेहाच्या अवस्थेवरून बांधण्यात येत आहे.
गड नदीच्या कुर्ला खटारा पात्राच्या कडेच्या भागात मृतदेह असल्याची कुजबूज कनेडी बाजारपेठेत गेले आठ दिवस सुरू होती. याबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील यांच्यासह त्यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन खात्री केली.
गडनदी पात्रातील उपसा केलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठीच्या पात्रातील मार्गाच्या जवळचं हा झाडाला मृतदेह लटकत असतानाही याबाबत एवढ्या दिवसात पोलिसात कोणीच खबर दिली नाही. तसेच याबाबत पोलिसांत कोणीच कोणत्याही प्रकारची तक्रार का दिली नाही ? याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपासाचे काम सुरू आहे.





