मुंबई, विधानपरिषद : उपजिल्हाधिकारी संवर्गातील रिक्त पदं पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही न्यायालयाच्या निकालानुसार येत्या 3 महिन्यात सुरु करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. न्यायालयीन प्रक्रियेमुळे या पदोन्नतीसाठी विलंब होत असल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणी न्यायालयात येत्या 23 तारखेला अंतिम सुनावणी आहे या निकालानंतर ही कार्यवाही करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील डोंगर दऱ्यांमधील अवैध उत्खननाला चाप लावण्यासाठी राज्याचं स्पष्ट धोरण आणलं जाईल असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत आणि सह्याद्री पर्वतरंगांमधील डोंगरांवर होत असलेलं अवैध उत्खनन रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचा तारांकित प्रश्न उद्धव ठाकरे गटाचे सुनील शिंदे यांनी विचारला होता, त्याला उत्तर देताना ते बोलत होते, या प्रकरणी अप्पर आयुक्तांमार्फत चौकशी सुरू असल्याचं विखे यांनी सांगितलं





