महिला व युवतींना सभासद करण्यासाठी अंनिस राबविणार अभियान…!

101

सिंधुदुर्ग : मागील चौतिस वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून महाराष्ट्र अंनिस, महाराष्ट्राच्या लोकजीवनातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करणे व समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, असे महत्वाचे समाज परिवर्तनाचे काम करीत आहे. संघटनेचा हा प्रवास आता व्यापक समाज परिवर्तनाकडे सुरू झाला आहे.

अर्थातच त्यामुळे समाजातील सर्व क्षेत्रातील, सर्व घटकांचा त्यात मोठ्या प्रमाणात समावेश असणेही आवश्यक आहे. परंपरेने समाजात चालत आलेल्या चालीरीती, रूढीं- प्रथा, व्रतवैकल्ये, विविध निरर्थक कर्मकांडे अशा गोष्टी विशेषतः समाजातील महिलांवर अधिक प्रमाणात लादल्या जातात. त्यामुळे महिलांची चिकित्सक वृत्ती मारली जाते. त्यातूनच त्या अंधश्रद्धांच्या शोषक आणि वाहक ठरतात.

म्हणून वेळीच युवती व महिलांना या अंधश्रद्धांची कारणे, त्यांच्या निर्मूलनासाठी उपाय याबद्दलची शास्त्रोक्त माहिती दिली तर, त्या स्वतः या अंधश्रद्धांमुळे सतत होणाऱ्या शोषणापासून मुक्त तर होतीलच, शिवाय समाजाच्या व्यापक परिवर्तनाच्या परिघातही समाविष्ट होतील.

म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सहभाग विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या औचित्याने १ मार्च २०२३ ते १० मार्च २०२३ असे दहा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर युवती आणि महिलांसाठी सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानाला महिला व युवतींनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस रंजना गवांदे, महिला सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह, आरती नाईक (संपर्क- 8752223803) सहकार्यवाह सारिका, डेहणकर (संपर्क- 9921291103) यांनी केले आहे.