वीर सावरकर संघ ठरला “परशुराम चषक” चा मानकरी | मैत्रिपार्क पुरळ उपविजेता

444

देवगड : ब्राह्मण समाजाच्या वतीने सिंधूभार्गव मित्र मंडळ सिंधुदुर्ग आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा परशुराम चषक २०२३ चे आयोजन २५ व २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मिठबाव येथील ग्रीन पार्क स्टेडियम येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या अंतिम सामना वीर सावरकर इलेव्हन विरुद्ध मैत्रीपार्क पुरळ या संघांमध्ये झाला. वीर सावरकर संघाने नाणेफेक जिकुंन प्रथम फलंदाजी करत ६ षटकात ५५ धावा केल्या. तर त्याला प्रत्युत्तर देताना मैत्रीपार्क पुरळ संघ सर्व गडी बाद व ३१ धावाच बनवू शकला. त्यामुळे यावर्षीच्या सिंधुभार्गव मित्रमंडळाकडून आयोजित केलेल्या परशुराम चषकाचा पहिला वीर सावरकर इलेव्हन संघ ठरला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना परशुराम चषक देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व सध्या तामिळनाडू येथे कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी शुभ्रमण्य केळकर, देवगड ब्राह्मण समाजाचे अरुण सोमण, मिठबाव ब्राह्मण समाजाचे नंदकुमार सोमण, तसेच प्रकाश गोगटे, विघ्नेश गोखले, सरपंच भाई नरे, अँड कौस्तुभ मराठे, अँड पंकज आपटे, माधव खाडिलकर, भूषण बोडस, समीर सोमण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी पहिल्या वर्षी उत्कृष्ट आयोजन नियोजन केल्याबद्दल सिंधूभार्गव मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांचे विशेष कौतुक केले.

या स्पर्धेमध्ये मैत्रीपार्क पुरळ, केसरी वॉरियर्स वीर सावरकर, योगेश्वरी इलेव्हन नारिंग्रे, गोमंतक ब्रह्मवैभव हे संघ ए गटातून होते. तर परशुराम स्पोर्ट्स कोल्हापूर, अभ्यद्य ब्रह्मशक्ती, फ्रेंडशिप इलेव्हन, चैतन्य स्पोर्ट सावंतवाडी व vk स्पोर्ट हे संघ बी गटातून असे एकूण दहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध भागांतील उत्कृष्ट खेळाडू मिठबाव येथील ग्रीन पार्क मैदानावर दाखल झाले होते.या स्पर्धेचा अंतिम सामना वीर सावरकर इलेव्हन विरुद्ध मैत्रीपार्क या संघांमध्ये झाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वीर सावरकर संघाने ६ षटकात ४ गडी बाद ५५ धावा केले. तर त्याला प्रत्युत्तर देताना मैत्रीपार्क पुरळ संघ सर्व गडी बाद ३१ धावा बनू शकला.अंतिम सामन्यात पुरळ संघाचा २४ धावांनी पराभव झाला.

त्यामुळे यावर्षी प्रथमच सिंधूभार्गव मित्रमंडळाकडून आयोजित पहिल्या परशुराम चषकाचा पहिला मानकरी हा वीर सावरकर इलेव्हन हा संघ ठरला. तर परशुराम चषकाचा उपविजेता मैत्रीपार्क पुरळ संघ ठरला. स्पर्धेतील तृतीय विजेता चैतन्य स्पोर्ट सावंतवाडी, चतुर्थ विजेता परशुराम इलेव्हन कोल्हापूर संघ. स्पर्धेतील सामनावीर गणेश फडके, मालिकावीर गिरीधर माईनकर, यष्टीरक्षक गणेश फडके, गोलंदाज केदार पटवर्धन सर्व (वीर सावरकर इलेव्हन) उत्कृष्ट फलंदाज अजय पौराणिक (मैत्रिपार्क पुरळ संघ) तर स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून योगेश्वरी इलेव्हन नारींग्रे संघाला गौरविण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिवशी सिंधूभार्गव मित्रमंडळ आयोजित परशुराम चषकावर आपले नाव कोरून वीर सावरकर या संघाने पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाला क्रिकेटच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न केला. याबद्दल वीर सावरकर या संघाचे संघ मालक समीर रुणकर व सर्व खेळाडूंचे विशेष अभिनंदन देवगड ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष अरुण सोमणसर यांनी केले. जिल्ह्यातील नामवंत पंच व समालोचक या स्पर्धेसाठी लाभले होते. यावेळी सिंधुभार्गव मित्रमंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.