दोन रात्रीत कलमठ – गावडेवाडी परिसरात नऊ ठिकाणी घरफोडी…!

कणकवली : कणकवली शहरालगत च्या कलमठ-बिड्येवाडी परिसरात सलग दुसऱ्यादिवशी चोरट्यांनी घरफोडी करून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. गुरूवारी रात्री कलमठ बिड्येवाडी येथे पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. या भागातील बंद चार बंगले गुरूवारी सायंकाळी चोरट्यांनी फोडल्याचे निदर्शनास आले होते. परंतु या घटनेत चोरांच्या हाती काही लागले नाही.

कलमठ-बिड्येवाडी येथील मंगेश मेस्त्री यांचे अनुसया जनरल स्टोअर्स व फ्लोअर मिल स्टॉल, अशोक राणे, संदिप म्हाडगुत, खवणेकर यांची बंद घरे फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. या भागातील स्वामी समर्थाच्या घुमटीच्या येथे चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. याभागात दोन रात्री नऊ ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. परंतु चोरीला काहीही गेले नसल्याने कोणीही पोलिसात तक्रार दाखल केली नाही. गुरूवारी सायंकाळी चोरीच्या घटनेत चोरट्यांनी बंद बंगल्यांना टार्गेट केले होते. कणकवली शहर व परिसरात अधुन-मधुन चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु चोरट्यांचा माग काढण्यात पोलिस तपासात यश येत नसल्याने चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिलेला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.