कणकवली : फायर ब्रँड नेते खा. संजय राऊत हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकवलीत दाखल होणार आहेत. असे असताना कणकवलीत त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांची मोठी तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान कणकवली पटवर्धन चौकात “इलाका तेरा धमाका मेरा” या टॅग लाईन ने लावलेला बॅनर हा जिल्हावासीयांचे लक्ष वेधत आहे. कणकवली पटवर्धन चौकात बाजारपेठ रस्त्याच्या सुरुवातीला ज्या ठिकाणी संजय राऊत यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्या स्वागत व्यासपीठाच्या समोर “इलाका तेरा धमाका मेरा” बॅनर हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
तसेच या बॅनर द्वारे नेमका हा इशारा कुणाला दिला आहे? याची चर्चा देखील आता रंगू लागली आहे. पटवर्धन चौकात खासदार संजय राऊत यांच्या स्वागतासाठी उभारलेले व्यासपीठ हे देखील संजय राऊतांच्या इशारे देणाऱ्या फोटोच्या बॅनरने लक्षवेधी ठरले आहे. इलाका तेरा धमाका मेरा, युवा सेना सिंधुदुर्ग अशा आशयाचा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लावलेला पटवर्धन चौकातील बॅनर हा या स्वागताच्या दरम्यान चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या आता रडारवर कोण असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





