अक्कलकोट (प्रतिनिधी)
अक्कलकोटमधून अध्यात्माचा प्रसार करणाऱ्या समर्थ नगरी परिवाराच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही ललिता पंचमी हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोट येथील आगमनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. राज्यभरातील स्वामीभक्त एकत्रित नामस्मरण सोहळ्यात सहभागी होऊन स्वामी चरणी आपली सेवा अर्पण करणार आहेत. यासाठी समर्थ नगरी अध्यात्मिक समितीचे कार्याध्यक्ष गणेश पाठक यांनी सर्व स्वामीभक्तांना आवाहन केले आहे.

या उपक्रमाअंतर्गत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे व वे.शा. सं. अण्णु महाराज (श्री स्वामीभक्त चोळपा महाराज वंशज) यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्या नियोजनानुसार नामप्रसार परिक्रमा पार पडली. या प्रसंगी ललिता पंचमी उत्सवाविषयी माहिती देत एकाच दिवशी, एकाच वेळेस राज्यभर नामस्मरण सोहळा साजरा करण्याचे ठरविण्यात आले.
विश्वशांती व मनशांतीसाठी सामूहिक नामस्मरण
शुक्रवार, दि. २६ सप्टेंबर रोजी नवरात्रातील पाचवी माळ, ललिता पंचमी या दिवशी सायंकाळी ५:२५ वा. अक्कलकोटसह राज्यभरातील सर्व ठिकाणी सामूहिक नामस्मरण सोहळा संपन्न होणार आहे. अक्कलकोटमध्ये हा सोहळा श्री विठ्ठल मंदिर ए-वन चौक येथे किंवा पावसाच्या नियोजनानुसार लोकापूरे हॉल, यलम्मा देवी मंदिर शेजारी पार पडेल.
अक्कलकोटकर व स्वामीभक्तांसाठी भाग्याचा दिवस
ललिता पंचमी या पवित्र दिवशी सकाळी ११ वाजता स्वामींचे सोलापूर रोडवर स्वागत करण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ५:२५ वा. अक्कलकोटसह राज्यभर नामस्मरण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन स्वामी चरणी सेवा अर्पण करण्याचे आवाहन वे.शा. सं. अण्णु महाराज (श्री स्वामीभक्त चोळपा महाराज वंशज, श्री स्वामी समर्थ समाधी मठ, अक्कलकोट) यांनी केले आहे.
समर्थ नगरीच्या माध्यमातून स्वामीनाम प्रसाराची सेवा सतत चालू असून हजारो भक्तांना दररोज स्वामींचे दर्शन घडते. तसेच विविध ठिकाणी साधनावर्ग सुरू करून नामस्मरण सेवा घडविण्यात येत आहे. “सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे,” असे आवाहन महेश क. इंगळे (चेअरमन, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट) यांनी केले.
राज्यभर व परराज्यातील नियोजन
अक्कलकोट, सोलापूर, बार्शी, सांगोला, इंदापूर, मिरज-सांगली, म्हैसाळ, तासगाव, मसूर-कराड, कोल्हापूर, चांदेकरवाडी, देवगड-हडपिड, मिठबाव, मिठमुंबरी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, ठाणे, बोरिवली, पालघर, भुईगाव, मुंबई, पुणे, हडपसर, पिंपरी चिंचवड, डेक्कन, बिबेवाडी-कात्रज, वडगावशेरी-गणेशनगर, नाशिक, सिन्नर, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, यवतमाळ, धुळे, उस्मानाबाद-नळदुर्ग-अणदुर्ग, नागपूर, चंद्रपूर तसेच कर्नाटकातील गुलबर्गा, शाहबाद, चिकोडी, बेळगाव, बेंगलोर व राजस्थान या ठिकाणी सामूहिक नामस्मरण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
महिला अध्यात्मिक समिती व कार्यकर्त्यांचा सहभाग
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी समर्थ नगरी महिला अध्यात्मिक समिती व कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. यामध्ये सुखदा ग्रामोपाध्ये, अश्विनी शिंपी, कावेरी धरणे, दीपा कोकणे, मनीषा जाधव (अक्कलकोट), शुभांगी पाठक, आरती काळे, सिद्राम वाघमोडे, सुभाष तारापुरे, कुमार पतंगे, ओंकार पाठक, गणेश पाठक, भीमराव धडके, चंद्रप्रकाश उदगिरी, विद्याधर गुरव, राहुल होटकर, प्रवीण शिंदे यांचा समावेश आहे.





