बांदा पोलिसांनी गोवा बनावटीची दारू पकडली ; १३ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, तेलंगणा मधील दोघे ताब्यात
बांदा (प्रतिनिधी)
बांदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे गोवा बनावटीचा लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात
तेरा लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,दोघे ताब्यात
पोलिसांनी एका पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा कारमधून सुमारे ५ लाख ८१ हजार रुपयांची विदेशी दारू हस्तगत केली असून याप्रकरणी तेलंगणा राज्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अनिकेत भुपाल सावंत यांना कट्टा कॉर्नर येथे गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. यावेळी (टीजी १६ ए ४२४१) क्रमांकाची एर्टिगा कार संशयास्पदरीत्या आढळली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत विविध प्रकारची एकूण ५ लाख ८१ हजार ६०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. या दारू वाहतुकीसाठी वापरलेली ८ लाख रुपये किंमतीची एर्टिगा कार असा एकूण १३ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी पोलिसांनी भुमेश नरसिंह इस्पी (वय ३९) आणि अजय कुमार अंजय्या गोपू (वय २८, दोघेही रा. भीमगल मंडल, जि. निजामाबाद, तेलंगणा) या दोन आरोपींना अटक केली आहे. बांदा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ), ६५(इ), ८१, ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज झांजुर्णे करत आहेत.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम व डीवायएसपी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, उपनिरीक्षक शिवराज झाजुर्ने, हेड कॉन्स्टेबल शेखर मुणगेकर, पोलीस हवालदार अनिकेत सावंत, महिला हवालदार आदिती प्रसादी यांनी केली आहे.






