कोटकामते ग्रामस्थ आक्रमक ; बेकायदेशीर व निष्कृष्ट काम तात्काळ थांबवा अन्यथा आंदोलन
महावितरण अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा ठेकेदाराशी संगनमत करून विना परवानगी कामाचा घाट
कोटकामते–नारिंगे मार्गावर सुरू असलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे पुन्हा एकदा महावितरण प्रशासन आणि ठेकेदारांचा मुजोरीपणा उघडकीस आला आहे. ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी, पत्रकारांमार्फत झालेले वृत्तांकन आणि स्पष्ट विरोध धाब्यावर बसवत, सर्व नियम मोडीत काढून विना परवानगी जबरदस्तीने काम सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.
दरम्यान, श्री देवी भगवतीच्या ३५० वर्षांच्या अखंड परंपरेचा शारदीय नवरात्री उत्सव तोंडावर असताना रस्ता खोदकाम सुरू झाल्याने धार्मिक व सांस्कृतिक परंपरेशी खेळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ऐन यात्रेच्या काळात गावाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या बेकायदेशीर कामाचा ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवत ठाम विरोध केला .तसेच उपसरपंच गणेश घाडी, माजी उपसरपंच विजय कुडपकर, समाजसेवक सत्यवान चुनेकर, पोलिस पाटील राणे साहेब यांच्यासह अनेक ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेऊन ठेकेदाराशी थेट चर्चा केली व काम तातडीने थांबविण्यात आले.
दरम्यान, मराविम अधिकारी श्री. निमकर यांच्याशी ग्रामस्थांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित अधिकारी फोन न उचलता टाळाटाळ करत राहिल्याची माहिती मिळाली. अखेर ग्रामस्थांनी साबावि अधिकारी निकाळजे यांच्याशी संवाद साधत हा प्रकार उघड केला.
हे बेकायदेशीर काम त्वरित थांबविण्यात यावे. अन्यथा मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन उभारले जाईल.”असा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.