देवगड (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी समाजात मोठे व्हावे, आई वडील व शाळेचे नाव उज्वल करावे – विसाजी लोके
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मिठबाव येथे १०० विद्यार्थ्यांना सायकल वाटप
“मी या संस्थेचा व मुंबईचा विद्यार्थी आहे, माझ्या शाळेला मदत करण्याची संधी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मिळाली, हे माझं भाग्य आहे. कोणताही पक्षभेद न करता समाजकारण करत राहणे हीच आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांनी समाजात मोठे व्हावे आणि आई-वडील व शाळेचे नाव उज्ज्वल करावे,”असे प्रतिपादन मिठबाव गावचे सुपुत्र , उपजिल्हाप्रमुख तथा परिवहन सदस्य नवी मुंबई महापालिका विसाजी लोके यांनी केले.
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई बेलापूर विधानसभा जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या संकल्पनेतून व विसाजी लोके यांच्या विशेष प्रयत्नातून श्री रामेश्वर हायस्कूल मिठबाव व गावातील गरजू १०० शालेय विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नवी मुंबई उपप्रमुख व विसाजी लोके, सरपंच भाई नरे, क्षा.म. शिक्षण संस्था मिठबाव सहाय्यक कार्यकारी अधिकारी व अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य , उपसरपंच ममता फाटक, देवगड तालुका प्रमुख अमोल लोके ग्रामपंचायत सदस्य आशुतोष कातवणकर, सदस्या अक्षया लोके, समन्वयक निलेश ढोके, रामेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक आर.आर. राऊत, महोत्सव समिती सदस्य मंगेश पारकर, माजी उपसरपंच जयाजी जोगल, पालक समिती सदस्य सचिन बापर्डेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य छोटू ढोके, पालकवर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांसह मान्यवर उपस्थित होते.
“गरजू विद्यार्थ्यांना आणि माझ्या शाळेला मदत करण्याची संधी सेनेच्या माध्यमातून मिळाली.त्यात खारीचा वाटा उचलता आल्याने आम्ही धन्य आहोत.”असे मत यावेळी समन्वयक निलेश ढोके व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक आर.आर. राऊत यांनी केले. सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले तर आभार रुपेश नेवगी यांनी मानले.





