सिंधुदुर्गनगरी : राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण क्रीडा प्रकारात यश मिळविलेली सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिचे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी अभिनंदन करत प्रशानाच्यावतीने सन्मान करण्यात आला. व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे अशा शुभेच्छाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या तसेच जिल्हा पत्रकार संघाच्यावतीनेही सत्कार करण्यात आला आहे.
पुणे -बालेवाडी येथील क्रीडा संकुल मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण घेत असलेली सिंधुदुर्गनगरी येथील पूर्वा गावडे हिने जानेवारी मध्ये पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र ऑलम्पिक जलतरण क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण व दोन कांस्य पदके पटकावली होती, अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वुमन सिरीज मध्ये दोन रौप्य पदके पटकावली होती. ओरिसा – भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेतही रौप्य पदक पटकावले होते. तर नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही रौप्य पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठो निवड झाली होती. जलतरण क्रीडा स्पर्धेतील या यशाबद्दल पूर्वाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी पूर्वा गावडे हिला जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिचा पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, आई व वडील उपस्थित होते.
जिल्हा पत्रकार संघामार्फतही पूर्वाची भेट घेऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव देवयानी वरसकर, माजी अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष बाळ खडपकर, नंदकुमार महाजन, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत आयोजित ओरोसमध्ये पार पडलेल्या सिंधूसकल्प कार्यक्रमात माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्तेही पूर्वाचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाई सावंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सध्या तेरसे, प्रभाकर सावंत उपस्थित होते.





