देवगड (प्रतिनिधी)
सुमारे तीनशे वर्षांनंतर मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात रंगणार श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिड दिवसीय सप्ताह उत्सवाची धामधूम
इतिहासातील एक अनमोल पर्व पुन्हा उजाळून देणारा क्षण! तब्बल तीनशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिठबाव श्री देव रामेश्वर मंदिरात गोकुळ अष्टमीचा सात प्रहरांचा उत्सव सोहळा शुक्रवार १५ ऑगस्ट २०२५ मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. या सप्ताहात पारंपरिक श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम पाहायला मिळणार असून, स्थानिक तसेच परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे आकर्षक चित्ररथ, देखावे आणि दिंड्यांचे भव्य सादरीकरण. विविध धार्मिक प्रसंगांचे दर्शन घडवणारे हे चित्ररथ सजवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या मेहनतीने तयारी सुरू केली आहे. रंगीबेरंगी वेशभूषा, पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघणाऱ्या दिंड्या आणि देखाव्यांची कलात्मक मांडणी यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरणार आहे.
उत्सवाच्या अंतिम टप्प्यात दही हंडी आणि गोपाळकाला यांचा जल्लोष पहायला मिळणार आहे. दही कालाच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने हंडी फोडण्याचा थरार आणि गोपाळकालाच्या निमित्ताने गावकरी एकत्र जमून आनंद, ऐक्य आणि बंधुत्वाचा संदेश देणार आहेत.
विशेष म्हणजे, हा उत्सव मिठबाव, तांबळडेग आणि कातवण या तिन्ही गावांतील गावरयत एकत्र येऊन साजरा करणार आहेत. गावागावातील एकोपा, सामूहिक सहभाग आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन हीच या सोहळ्याची खरी ओळख ठरणार आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, “इतक्या वर्षांनी हा भव्य सोहळा पुन्हा अनुभवायला मिळतोय, हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आज नव्या उमेदीने जिवंत होत आहे.”





