तब्बल ५६ हजार रूपयांची रोकड लंपास | बँक ऑफ इंडिया शाखेतील घटना
कणकवली : बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या कणकवली नगरपंचायत कर्मचाऱ्याला लुबाडल्याची घटना आज बँक ऑफ इंडियाच्या कणकवली शाखेत घडली. तब्बल ५६ हजार रूपये हातोहात लंपास करण्यामध्ये ती महिला यशस्वी झाली. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही घटना घडली.

नगरपंचायतचे शिपाई संजय रविकांत राणे (रा.टेंबवाडी) हे आज सकाळी १२:१५ वाजता बँक ऑफ इंडिया शाखा – कणकवली येथे ऑफिसची रोख २ लाख ६ हजार ४१० रुपये ही रक्कम भरण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी अज्ञात दोन महिलांनी बॅग मधील दोन बंडल ५६ हजार ४१० रुपये काढत धाडसी चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कणकवली पोलिसांनी भा. द. वी. कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. महिला चोरी करताना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कणकवली नगरपंचायत मधील विविध कर स्वरूपातील जमा झालेली रक्कम अकाउंटंट प्रियांका सोंसुरकर यांनी बँकेत जमा करण्यासाठी फिर्यादी नगरपंचायत शिपाई संजय रविकांत राणे यांच्याकडे दिली.त्यामुळे संजय राणे यांनी खांद्याला लावायच्या बॅगेतून ५० हजारांचे ४ बंडल,६ हजार १४० रुपयांचे १ बंडल अशी एकूण २ लाख ६ हजार १४० रुपये घेऊन बँक ऑफ इंडिया शाखा कणकवली या शाखेत सकाळी १२:१५ वाजता गेले होते. तेव्हा पैसे बँकेत जमा करण्यासाठी बँक स्लीप टेबलावर ठेवली आणि बॅगेतून पैसे काढत असताना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे संजय राणे यांनी नगरपंचायत अकाउंटंट प्रियांका सोंसुरकर संपर्क साधून पैसे कमी आहेत? असे सांगितले.तेव्हा तातडीने अकाउंटंट प्रियांका सोंसुरकर या बँकेत आल्या. मात्र, ५६ हजार १४० रुपये कमी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर बँकेतील सीसीटिव्ही कॅमेरे फुटेज पाहिले असता एका महिलेने संजय राणे यांच्या बॅगेतून दोन बंडल बाहेर काढल्याचे दिसत आहेत. चोरी केलेली दोन बंडल दुसऱ्या एका बॅगेत ठेवून ती बॅग दुसऱ्या महिलेच्या ताब्यात दिल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे.त्या महीलेच्या अंगावर गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस व टॉप, पायजमा आहे. कणकवली नगरपंचायत शिपाई संजय राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या दोन महिलांनी नगरपंचायतची रक्कम बॅगेतून चोरी करत स्वतःच्या फायद्यासाठी आणि लबाडीच्या इराद्याने चोरी केल्याप्रकरणी कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.





