सावंतवाडीत दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी वृध्देला लुटले

18

 

सावंतवाडी (प्रतिनिधी)

सावंतवाडीत दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी वृध्देला लुटले

. खासकीलवाडा येथील घटना; सीसीटिव्हीच्या माध्यमातून शोध सुरू, गुन्हा दाखल
बाजूला चोरी झाली आहे. त्यामुळे तुमचे दागिने लपवून ठेवा, असे सांगत येथील खासकीलवाडा भागात इव्हिनिंग वॉक करणार्‍या एका वृध्देला दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी लुटले. ही घटना आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर परिसरात घडली. अलकनंदा अनंत परब (वय ६५) असे तिचे नाव आहे. यात तिचे दोन हातातल्या बांगड्या चोरीला गेल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील परब या मुळच्या कल्याण-मुंबई येथील आहेत. त्यांनी लक्ष्मीनगर येथे फ्लॅट घेतला आहे. त्या ठिकाणी त्या आपल्या कुंटूबियासमवेत राहतात. आज सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्या इव्हिनिंग वॉकसाठी लक्ष्मीनगर परिसरात फिरत होत्या. यावेळी त्या ठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञात तरुणांनी बाजूला चोरी झाली आहे. तिकडे पोलिस आहेत. त्यामुळे चोरांकडुन तुमची फसवणूक होवू शकते ते दागिने आमच्याकडे द्या आम्ही सुरक्षित बांधून देतो, असे सांगून त्यांनी तिच्याकडुन दानिगे घेतले आणि रुमालात बांधून दिले.
दरम्यान परब यांनी काही वेळाने पाहिल्यानंतर त्या रुमालात दागिने दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी आपल्या घरातील लोकांना ही कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. काही वेळाने उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक पंकज शिंदे, हवालदार हनुमंत धोत्रे, अभिजीत कांबळे आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली व संबधित चोरट्यांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. दरम्यान याबाबत तपासिक अंमलदार तथा सहाय्यक पोलिस निरिक्षक पंकज शिंदे यांनी माहिती दिली.
ते म्हणाले, संबधित चोरट्यांनी त्या वृध्देला चुकीची माहिती देवून फसविले. आपण फसलो हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो. मात्र तो पर्यंत ते पळून गेले होते. आता सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास करण्यात येणार आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात दोघा चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.