कुडाळ (प्रतिनिधी)
पिंगुळी येथे रेल्वे लोखंडी रुळाची चोरी ; चोरीच्या रुळाच्या वापर स्मशानभूमीसाठी ; पोलिसांचे दुर्लक्ष केल्याने उबाठा आक्रमक दिला आंदोलनाचा इशारा
पिंगुळी येथे कोकण रेल्वेच्या लोखंडी रुळांची चोरी करून ते रूळ पिंगुळी देऊळवाडी येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आले. ग्रामस्थांनी यावर आवाज उठविताच स्मशानभूमीला लावलेले लोखंडी रुळ काढून ते गायब करण्यात आले आहेत. याबाबतची लेखी तक्रार कोकण रेल्वेच्या रत्नागिरी येथील प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक यांच्याकडे देऊन महिना झाला आणि कणकवली रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना यांची माहिती असूनही संबंधितांवर चोरीचे गुन्हे दाखल केले नाहीत त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली पिंगुळी येथील ग्रामस्थ व शिवसैनिकांनी कणकवलीतील रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) कार्यालयात धडक देत आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना याचा जाब विचारला.
यावेळी या घटनेची तक्रार देणाऱ्या दीपक राऊळ यांनाच राजेश सुरवाडे यांनी उलट सुलट प्रश्न विचारल्याने माजी आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत हीच तत्परता गुन्हा दाखल करण्यासाठी का दाखवली नाही, ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल का घेतली नाही असा संतप्त सवाल केला.
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर,कणकवली तालुका संघटक राजू राठोड,शिवसेना विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर,पिंगुळी ग्रामस्थ दीपक राऊळ, चेतन राणे, दीपक धुरी, केतन शिरोडकर, नामदेव पिंगुळकर, सचिन ठाकूर, साज खान, रामा पिंगुळकर, संतोष सावंत आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.





