मुंबई : मुंबई शहर अनेक नानाविध वैशिष्ट्याने नटलेले आहे . शहरातील दळणवळणाच्या आधुनिकीकरणात एसी लोकल , मेट्रो, मोनोरेल यांची भर पडली. शतकाहून अधिक वर्षे सेवा देणाऱ्या बेस्ट बसेसची देखील आधुनिकीकरणाला सुरुवात झाली. सिंगल डेकर एसी बसेस नंतर इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बस सुरू झाली. आता त्यात भर पडते आहे ती एसी डबल डेकर बसची. बेस्टच्या डबल डेकर बसेसचा इतिहास आता डिजिटलप्रणालीत प्रवेश करत आहे. बेस्टच्या डबलडेकर बसेस अत्यंत जुन्या झाल्याने त्यांची देखभाल करणे अवघड झाले आहे. त्यामुळे बेस्टच्या डिजिटलीकरणात आता नव्या इलेक्ट्रीक एसी डबल डेकर बसेस दाखल होणार आहेत. मुख्यतः देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बेस्टच्या ताफ्यात सामील झाली आहे. आरटीओचा क्लिअरन्स मिळाल्यानंतर ही बस रस्त्यावर धावणार आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST)च्या भारतातील पहिल्या एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसचा ताफा या आठवड्यात मुंबईच्या रस्त्यावर धावण्यासाठी सज्ज झाला आहे. रविवारी सायंकाळी उशिरा या बसेसचा ताबा बेस्टला मिळाला आहे. बेस्टच्या ताफ्यात 45 डबलडेकर बसेस आहेत. मात्र या बसेसची वयोमर्यादा संपुष्टात येत असल्याने नवीन 900 वातानुकूलित डबलडेकर बसेस समाविष्ट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. अशोक लेलँड कंपनीच्या या बसेस आहेत. या इलेक्ट्रिक बस पर्यावरणपूरक असल्याचा दावा केला जातोय. मात्र सुरुवातीच्या काळात आठवड्यातून एक बस सुरू करून बसचे निरीक्षण केले जाईल. त्यानंतर काही चाचण्या केल्यानंतर प्रवाशांसाठी ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली.
देशातील पहिली स्विच मोबिलिटीने निर्मित या डबल- डेकर ई-बसचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उद्घाटन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सप्टेंबर 2022 मध्ये ही बस बेस्टच्या ताफ्यात सामील होईल अशी बेस्टची अपेक्षा होती, मात्र ही अपेक्षा फोल ठरली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) कडून आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त करण्यास विलंब झाल्यामुळे यामागचे वेळापत्रक कोलमडले होते.
प्रत्येक बसची किंमत ₹२ कोटी असून एका बसमध्ये प्रत्येकी सुमारे ९० प्रवासी प्रवास करू शकतात. ही बेस्ट सेवा वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक या मार्गांवर धावणार आहे. कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गावर सुरुवातीला ही बस धावेल. या एसी बसचं कमीत कमी भाडं ५ किलोमीटरपर्यंत ६ रुपये असणार आहे. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था, बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असतील.





