सिंधुदुर्गनगरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील सत्यता बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असताना पोलिसांच्या तपासात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत करत आहेत. राऊत जाणीवपूर्वक या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव घेत आहेत. पंढरीनाथ आंबेरकर हा रिफायनरी समर्थक असल्याने अनेक राजकीय पक्षांसोबत त्याच्या भेटीगाठी झाल्या आहेत. यामध्ये स्वतः विनायक राऊत याच्यासोबत देखील भेट झाली आहे . परंतु केवळ भेट झाली म्हणून या व्यक्तींचा पत्रकार वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणात संबंध जोडणे चुकीचे आहे. परंतु खासदार विनायक राऊत जाणीवपूर्वक नारायण राणे यांचे नाव घेऊन तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्यांच्यावर ३५३ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी ओरोस येथे पत्रकार परिषदेत केली आहे.





