राज्यावरील पुढची संकटे दूर व्हावीत, बळीराजा सुखी समाधानी व्हावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुमाऊलीला घातले साकडे
आज आषाढी एकादशीच्या पावन दिवशी पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर उसळला आहे. पंढरीत पहाटे अडीच वाजल्यापासून पूजा, टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठलनामाचा जयघोष सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. यावर्षी मानाच्या वारकरीपदाचा मान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील कैलास दामू उगले आणि कल्पना उगले या शेतकरी दाम्पत्याला मिळाला. गेल्या १२ वर्षांपासून विठ्ठलभक्तीत लीन असलेल्या उगले दाम्पत्याने पहाटे मंदिरात थेट मुख्यमंत्री दांपत्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली. पूजेनंतर त्यांचा शासकीय सत्कारही करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला अन् विठुरायाला साकडे घातले.