देवगड तालुक्यातील नाडण – जोशीवाडी येथील सुदेश बाबी नारकर (३०) हा युवक कणकवली येथून ३१ मे रोजी दुपारी ३.३० वा. पासून बेपत्ता झाला आहे. याबाबातची खबर त्याची पत्नी पूनम सुदेश नारकर (२८, नाडण – जोशीवाडी) हिने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सुदेश काही कामानिमित्त मुंबईला गेला होता. ३० रोजी पत्नी पूनम हिने फोन केला असता आपण कणकवली येथे एका मित्रासमवेत असल्याचे सुदेश याने सांगितले. मात्र, ३१ रोजी पूनम हिने फोन केला असता सुदेशचा मोबाईल बंद होता. तर सुदेश याचा भाऊ शैलेश याने आपले व्हॉट्सअॅप तपासले असता त्याला सुदेश याने केलेला मेसेज दिसला. ‘माझ्या जिवाचे काही बरे वाईट झाल्यास ‘ती’ व्यक्ती जबाबदार राहील. ‘ते’ माझ्या घरात येऊन बसले आहेत.’, असा मेसेज सुदेश याने केला होता. त्यानंतरही सुदेश याचा मोबाईल बंदाच लागत होता. सर्वत्र शोधा घेऊनही न सापडल्याने अखेर पत्नी पूनम हिने पोलिसांत खबर दिली आहे.
सुदेश याचा बांधा मध्यम, चेहरा गोल, उंची ५.५ फुुुट, रंग सावळा, अंगात हाफ टिर्शु, फुलपॅंट आहे. त्याच्या उजव्या दंडावर इंग्रजीत ‘एसबी’, हातावर ‘पीके’ व मनगटावर काहीतरी नक्षी गोंदविलेली आहे. अशा वर्णनाचा युवक आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.