महिला प्रवाशाच्या पर्समधील पावणे दोन लाखाचे दागिने चोरीस | कणकवली बसस्थानकामधील घटना…!

कणकवली : आचरामार्गे मालवण जाणाऱ्या बसमध्ये महिला प्रवाशी रंजना रविकांत तावडे (५०) रा. घोटगे-पायरवाडी ता.कुडाळ हिच्या पर्समधील पावणे दोन लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लांबवण्याची घटना घडली. तीन दिवसापूर्वी ही चोरीची घटना घडली असली तरी भित्र्या स्वभावाच्या रंजना या चोरीच्या घटनेमुळे अक्षरश: भेदरल्या. त्यांनी दोन दिवस कुणालाच हा प्रकार सांगितला नाही. घरात ही घटना समजताच घरातील माणसांनी तिची समज काढून तिला पोलिसात तक्रार करण्यासाठी पाठविले.

कणकवली आचरामार्गे मालवण बसमध्ये ९ फेब्रुवारी रोजी दुपारी १.४५ वा.च्या सुमारास ही घटना घडली. रंजना तावडे या महिलेला नणंदेच्या मुलीकडे त्रिंबकला जायचे होते त्यासाठी कुडाळहून कणकवलीला आली. नंतर त्रिंबकला जाण्यासाठी आचरामार्गे मालवण या एस.टी.ने जाण्यास निघाली. बस कलमठ बाजारपेठेदरम्यान गेली असताना बसच्या तिकिटासाठी पैसे काढण्यासाठी पर्स उघडली असता तिच्या निदर्शनास आले की सोन्याचे दागिने ठेवलेला पुठ्याचा बॉक्स गायब झाला होता. त्या बॉक्समध्ये २९ ग्रॅम चे सोन्याचे मंगळसुत्र व कानातील तीन – तीन ग्रॅम वजनाच्या कानातल्या चैन होत्या.

सोन्याच्या दागिण्यांची चोरी झाल्याचे लक्षात येताच रंजना तावडे पुरत्या भेदरल्या त्यांनी घरात ही घटना ताबडतोब कुणालाही सांगितली नाही. शनिवारी तीने हा प्रकार भावाला सांगितल्याने भाऊ कणकवली पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. परंतु ज्या व्यक्तीचे दागिने चोरीला गेले तीनेच तक्रार दाखल केली पाहिजे असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यानुसार रंजना रविकांत तावडे यांनी रविवारी पोलिसात तक्रार दाखल केली.