आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू बेनहुर सोलोमन यांना जीवनगौरव पुरस्कार…!

देवगड : ऑल इंडिया सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस अॅन्ड कल्चरल बोर्ड, दिल्ली यांच्यावतीने सेंट्रल एक्साईज, मुंबई येथे अधिक्षक पदावर कार्यरत असलेल्या ५६ वर्षीय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू बेनहुर सोलोमन यांना या खेळात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल नुकतेच जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गांधीनगर, गुजरात येथे झालेल्या ऑल इंडिया सेंट्रल सिव्हिल सर्व्हिस बॅडमिंटन स्पर्धेचे औचित्य साधून सोलोमन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भारतीय बॅडमिंटन संघटनेचे संयुक्त सचिव मयुर पारेख आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू, स्पर्धा प्रमुख राजीव शर्मा यांच्या उपस्थितीत सोलोमन यांना गौरविण्यात आले. १९९३ मध्ये सेंट्रल एक्साईज मुंबई येथे निरिक्षक पदावर खेळाडू म्हणून त्यांना नोकरी मिळाली. त्यांनी पदार्पणातच ऑल इंडिया सेंट्रल रेव्हेन्यू बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीचे सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. या स्पर्धेत सातत्याने चांगली कामगिरी करुन भरघोस पदकांची कमाई सोलोमन यांनी केली. या स्पर्धेत त्यांनी अनेकदा आपल्या संघाचे कर्णधारपद देखील भूषविले.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मिलिंद पूर्णपात्रे हे या स्पर्धेत सोलोमन यांचे पुरुष दुहेरीमध्ये तब्बल २५ वर्षे जोडीदार होते. सोलोमन-पूर्णपात्रे या जोडीने या स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीचा ठसा उमटवला. गेली १० वर्षे बेनहूर महाराष्ट्राचे ऑल इंडिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिनिधित्व करत आहेत. इस्रायलमध्ये दर चार वर्षांनी जागतिक ज्यूईश गेम या स्पर्धा होतात. या स्पर्धेत बेनुहर यांनी पाच वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांंनी या स्पर्धेत १रौप्य, २ कांस्य पदके मिळविली. आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत बेनहुर यांनी मुंबई विद्यापीठाचे कर्णधार पद देखील भूषविले.

आपल्या आजवरच्या यशाचे श्रेय बेनहुर आपल्या कुटुंबियांना देतात. जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत या खेळाचा आनंद मी घेणार आहे. तसेच युवा खेळाडूंना प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचे कार्य जोमाने पुढे चालू ठेवण्याचा निर्धार बेनहुर यांनी व्यक्त केला आहे.