रोणापाल ग्रामस्थांचे धरणे उपोषण १५ दिवसांसाठी स्थगित सुरेश गावडे यांची माहिती

17

 

बांदा (प्रतिनीधी)

रोणापाल ग्रामस्थांचे धरणे उपोषण १५ दिवसांसाठी स्थगित सुरेश गावडे यांची माहिती

तिलारी कालवा दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असल्याने रोणापाल ४४ किलोमीटर पर्यंत पाणी येण्यास अडचणी आहेत. मात्र येत्या १५ दिवसात पाणी रोणापाल पर्यंत पोहोचेल असे ठोस आश्वासन तिलारी कालवा विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही. बी. चव्हाण यांनी दिले. त्यामुळे सुरेश गावडे यांनी पुकारलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

 

तिलारी कालव्याचे पाणी अद्याप रोणापाल पर्यंत न पोचल्याने शेतकऱ्यांची शेती बागायती पाण्याअभावी करपून गेली आहे. त्यामुळे कालवा विभागा विरोधात शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे सुरेश गावडे यांनी शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी कालव्यात बसून धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अधीक्षक अभियंता व्ही. बी. चव्हाण यांनी सुरेश गावडे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी चर्चा केली.

 

तिलारी कालवा दुरुस्तीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. त्यासाठी थोडा कालावधी द्या अशी विनंती गावडे यांना केली. येत्या पंधरा दिवसात पाणी रोणपालपर्यंत पोहोचेल, असे ठोस आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले. त्यामुळे सुरेश गावडे यांनी धरणे आंदोलन पंधरा दिवसांसाठी स्थगित केल्याची माहिती दिली.