कुडाळ शहरात गाडी लावण्यावरून दोन युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची | वाहतुकीस अडथळा, बघ्यांची गर्दी

110

कुडाळ : रस्त्यावर गाडी लावण्याच्या कारणावरून दोन युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातील एका युवकाबरोबर असलेल्या एका महिलेने अरेरावी करणारे शब्द वापरल्याने कुडाळच्या नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला.
कुडाळ शहरात नक्षत्र टॉवर येथे एका पक्षाच्या युवकाने त्या ठिकाणी कार पार्क केली होती. तर बाजूलाच रस्त्यावर कुडाळ शहरातील युवकांनी आपली कार थांबविली होती. नक्षत्र टॉवर येथून कार पर्यायी मार्गाने न नेता त्या पक्षाच्या युवकाने दुचाकीसाठी असणाऱ्या जागेतून आपली कार रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केला.

यावेळी या ठिकाणी शहरातील कार उभी होती. ही कार पुढे मागे घेण्याच्या कारणावरून दोन्ही युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. हे एवढ्यावरच थांबले नाही तर त्या ठिकाणी पक्षाच्या युवकासमवेत असणाऱ्या महिलेने कारवर लाथा मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी होवून रहदारी वाढून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

त्यानंतर सदर ठिकाणी पोलीस आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आले. त्या महिलेने हा वाद असताना शहरातील युवकाने कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचे वारंवार ओरडून सांगत होती. मात्र, त्याच्यासोबत असणारा युवक शांत होता. त्याने आपल्या मोबाईलवरून पोलिसांना बोलावले. घटनास्थळी पोलिसांनी तिघांनाही पोलिस ठाण्यात नेले. या घटनेची कुडाळ शहरात मोठी चर्चा रंगली.