संगीत प्रासादिक ही भजन कला केवळ कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्हयांनी जपली आहे – विनायक राऊत
देवगड- प्रतिनिधी २९ जुलै २०२४
संगीत प्रासादिक ही भजन कला केवळ कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्हयांनी जपली आहे.ही वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासू कला चिरंतन ठेवण्यासाठी आजच्या युवा कलाकारांनी पुढाकार घेतला पाहिजे. तरच या कलेचे महत्व समाजमनात टिकून राहील, सध्याच्या युगात बाजारी राज्यकर्ते,राजकारणी आपल्याला भरपूर दिसत असतील.मात्र, प्रत्यक्ष भगवंताच्या नामस्मरणात भजनासारख्या पवित्र कलेच्या मार्गाने समाजाला चांगल्या विचारांनी प्रोत्साहीत करण्याचे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी युवासेना चषक भजन स्पर्धेच्या माध्यमातून केले आहे.असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील इंद्रप्रस्थ हॉल येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या युवासेना चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दूधवडकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर,शिवसेना तालुकाप्रमुख जयेश नर,युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, फरिद काझी,शिवसेना महिला तालुकाप्रमुख हर्षा ठाकुर, सायली घाडीगावकर,नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी,माजी तालुकाप्रमुख अँड. प्रसाद करंदीकर,रवींद्र जोगल, प्रदीप नारकर, हर्षा ठाकूर आदी उपस्थित होते. अरुण दूधवडकर म्हणाले, येथील भजन कला ही कोकणच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक वेगळी ओळख आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा भजनी कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम युवासेनेने केले आहे.
यावेळी सुशांत नाईक म्हणाले, आजची युवा पिढी ड्रग्जसारख्या व्यसनाच्या आहारी जात आहे. या युवा पिढीला योग्य दिशा देण्याची गरज आहे.भजन कला ही कोकणची संस्कृती असून ती जपण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.सांस्कृतिक चळवळ वृद्धिंगत व्हावी व युवा पिढीला नवी दिशा मिळावी, हा स्पर्धा आयोजनातील मुख्य हेतू होता. स्पर्धेला युवा भजनी कलाकारांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा हेतू सफल झाला.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार भगवा सप्ताह राबविण्यात येत असून याअंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात ‘सेल्फी विथ मशाल’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पारकर म्हणाले, भजन कलेला लोकाश्रय मिळाला असून राजाश्रय मिळायला हवा. भजन क्षेत्रात आर्थिक सुबत्ता येणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. आपल्या खासदारकीच्या काळात विनायक राऊत यांनी भजन क्षेत्राला ताकद देण्याचे काम केले आहे. भजन कला मंत्रमुग्ध करणारी असून या कलेचा आस्वाद घेतला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
घाटे म्हणाले, भजन क्षेत्राला देवगड तालुक्याने नामांकित भजनी बुवा व कलाकार दिले आहेत. सांस्कृतिक चळवळीत देवगडने वेगळा ठसा उमटविला आहे.शिवसेना काँग्रेस महाविकास आघाडी सरकारच्या काळात कलाकारांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला होता. सांस्कृतिक क्षेत्राला बळ देण्यासाठी व पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी एकोप्याने काम करण्याची गरज आहे. राऊत यांनी खासदार म्हणून चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भजन स्पर्धा परीक्षक रुपेंद्र परब,हेमंत कवटे तसेच तालुक्यातील ज्येष्ठ भजनी बुवांचा सत्कार खासदार राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तिर्लोट ठाकुरवाडी येथील कार्यकर्त्यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश गावकर यांनी केले. सूत्रसंचालन पंकज दुखंडे यांनी केले. दरम्यान, यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात ७६ दात्यांनी रक्तदान केले.










