देवगड : श्री देव कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा 18 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. या यात्रेची पहिली पूजा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासन, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर यांच्या वतीने योग्यरित्या नियोजन करण्यात येत असल्याची माहिती श्री. देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात यात्रा नियोजनाबाबत देवस्थान ट्रस्टवतीने पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, सचिव शरद वाळके, खजिनदार अभय पेडणेकर, ट्रस्टचे संचालक दीपक घाडी, मंगेश पेडणेकर, अजय नाणेरकर, संतोष लाड, संजय आचरेकर, व्यवस्थापक रामदास तेजम आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, श्री. क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सव १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान होत असून यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्री देव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यांच्या हस्ते श्रींची पहिली पूजा करण्यात येणार आहे. सोमवारी अमावस्या तीर्थस्नानाचा योग असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी भाविक भक्तांना दर्शनासाठी व त्यांच्या प्रवासाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन केले जात आहे.
देवस्थान ट्रस्टच्यावतीने देवालय परिसरातील कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. सोमवारी अमावस्या तीर्थस्नानाचा योग असल्यामुळे यावर्षी भाविकांचा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे दर्शन रांगांच्या व्यवस्थेच्या नियोजनात बदल करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यावर्षी जम्बो कॅमेराचा समावेश असणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. याची दक्षता घेण्यासाठी स्वयंसेवकांचे भरारी पथक आणि समुद्रकिनारी सागरी सुरक्षा दल कार्यरत असणार आहे.
२० फेब्रुवारी रोजी समुद्र तीर्थस्थानासाठी भाविक व देवभेटी करिता येणाऱ्या देवस्वाऱ्या यांना संपूर्ण दिवस लाभ घेता येणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर सर्व ठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आली आहे. चेंजिंग रूमची व्यवस्था ही पुरुष व महिलांसाठी ठेवण्यात आली आहे.
मात्र यात्रा परिसरामध्ये राजकीय बॅनर्स व इतर बॅनर पासून सुरक्षितता असावी यासाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कडून स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. रस्त्यांवरती बॅनरच्या कमानी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पूजा फळ विक्रेते व व्यापारी यांना प्लास्टिक पिशव्या विक्री वापरावर बंदी करण्यात आली आहे. संपूर्ण यात्रेचे एलईडीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. असेही ट्रस्टचे अध्यक्ष लब्दे यांनी सांगितले .





