बोर्डवे रेल्वेस्थानकासाठी खा- नारायण राणेंनी प्रयत्न करावेत !
कणकवली दि.२७ जून (प्रतिनिधी)
बोर्डवे येथील प्रस्तावित रेल्वेस्थानकाबाबत गेली १०वर्षे उलटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे रेल्वेस्थानक साकारल्यास आजूबाजूच्या सर्व गावांना फायदा होणार असून रोजगार निर्मितीही होईल. आचिर्णे, खारेपाटण ही स्थानके झाली, तरी बोर्डवे स्थानक होण्याबाबत अद्यापही कोणतीही हालचाल दिसत नाही. माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे आता खासदार झाले आहेत. त्यांनी बोर्डवे रेल्वेस्थानक अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न करावेत.
बोर्डवे रेल्वेस्थानक संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहन येंडे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याची माहिती – ओसरगांवचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यापूर्वी ओसरगाव तलाव विकसीत होण्यासाठी सातत्याने आवाज उठवला. तसेच बोर्डवे रेल्वस्थानक होण्यासाठीही नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धारही बबली राणे यांनी व्यक्त केला आहे.





