गव्यांनी सोडली हद्द ; थेट हॉस्पिटलच्या दारात लावली उपस्थिती

202

गव्यांनी सोडली हद्द ; थेट हॉस्पिटलच्या दारात लावली उपस्थिती

सावंतवाडी (प्रतिनिधी) २० मे २०२४

सावंतवाडी शहरातील भर वस्तीकडे येणाऱ्या गवा रेड्यांनी आज सावंतवाडी येथील डॉ जयंत परुळेकर यांच्या परुळेकर नर्सिंग होम समोर आपली उपस्थिती लावली. अचानक दोन गवे हॉस्पिटलच्या दारात उपस्थित झाल्याने डॉ सह पेशंटची गाळण उडाली. सुदैवाने कोणालाही या गव्यानी दुखापत केली नाही. मात्र काही मिनिटातच गवे बाजूच्या जंगलात निघून गेले.

दरम्यान या प्रकाराबाबत डॉ परुळेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे भर वस्तीत येणाऱ्या गव्यांना रोखण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पत्र्याच्या कुंपणावरून जंगलात जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे हॉस्पिटलच्या बाजूला राहणारे शिर्के यांच्या कुंपणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.