बांदा (मंगल कामत) १४ मे २०२४
खडीकरण केलेल्या रस्त्याची साईडपट्टी कोसळली , पहा कुठे ते…
पाडलोस-मडुरा मार्गावरील केणीवाडा येथे खडीकरण केलेल्या रस्त्याची साईडपट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कोसळली. पाईपलाईनसाठी केलेल्या खोदाईकडे अधिकाऱ्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. दोन वाहनांना बाजू देताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. संरक्षक भिंतीची गरज असून याकडे दुर्लक्ष करत खडीकरणाचे काम सुरू आहे. भविष्यात येथे अपघात झाल्यास सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील, असे भाजप युवामोर्चा सावंतवाडी तालुका सरचिटणीस तथा पाडलोस ग्रा.पं. सदस्य काका परब यांनी सांगितले.
वर्षभरापूर्वी रस्त्याच्या बाजूने पाईपलाईनसाठी खोदाई करण्यात आली. त्यानंतर पावसाळ्यात साईडपट्टी कोसळली अन रस्ता धोकादायक बनला. एक वर्ष पूर्ण होऊनही अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष जात नाही. या ठिकाणी संरक्षक भिंतीची गरज असून याकडे दुर्लक्ष का होत आहे? केवळ कार्यालयात बसून रस्ते निर्धोक बनत नाही तर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अशा भोंगळ कार्यपद्धतीकडे लक्ष वेधणार असल्याचे भाजपचे काका परब यांनी सांगितले.





