नेरूरमधील ज्येष्ठ ‘रंगमहर्षी’ काळाच्या पडद्याआड…!

ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक-कलाकार व सुप्रसिद्ध भजनी बुवा श्री. बाळ करलकर यांना देवाज्ञा..!

कुडाळ : तालुक्यातील नेरूर गाव हा ‘कलावंतांचा’ गाव म्हणून ओळखला जातो. याच नेरूर गावाने आत्तापर्यंत अनेक थोर कलावंत विविध कलाक्षेत्राला दिले आहेत. त्यापैकिच एकेकाळी आपल्या भारदस्त पहाडी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि विविधांगी वैशिष्ट्यपूर्ण भुमिका साकारून तसेच आपल्या नाट्य दिग्दर्शनाच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे आदरणीय ज्येष्ठ रंगकर्मी श्री. बाळ करलकर हे होय.

वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करून ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी रंगभूमी व रंगदेवतेची सेवा केली. पांढरा सदरा, पांढरा लेंगा, ठोक्यावरती हॅट्, चेह-यावर स्मितहास्य व त्यांचे भारदस्त असे व्यक्तिमत्व प्रत्येक नेरूरवासियाला सुपरिचित असे होते.

या अत्याधुनिक वाहनांच्या काळात देखील वृद्धावस्था असतानाही कित्येक मैलाचा प्रवास ते आपल्या सायकलने करत असत.