बांदा येथिल प्रसिद्ध असलेल्या जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

24

श्री बांदेश्वर दर्शनाला भाविकांची गर्दी

बांदा (प्रतिनिधी)दि ८ मार्च २०२४

बांदा येथिल प्रसिद्ध असलेल्या जागृत स्वयंभू
श्री देव बांदेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.या सोहळ्यानिमित्त चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रम सुरु असून आदल्या दिवशी गुरूवारी रात्री पालखी सोहळ्याने हा उत्सव आरंभ झाला. शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी सुर्योदयापासुन ते दुसऱ्या दिवशी सुर्योदयापर्यंत स्वयंभू लिंगावर अष्टौप्रहर रुद्रावर्तनद्वारा अभिषेक सुरु होता.यासाठी बाहेर विहिरीतून पाणी काढून स्वयंभू लिंगावर थेट अभिषेकासाठी सकाळपासुन भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.सकाळी 8 वा. शिवलिलामृत ग्रंथाचे साखळी पारायण आरंभ झाले.यात ग्रंथ वाचनात अनेक भाविकांनी सहभाग घेतला.


सायं 3.30 ते 8.30 या वेळेत विविध भजनी मंडळांची भजने तसेच रात्री मंदिराभोवती श्रींच्या सवाद्य पालखी प्रदक्षिणा फेरीचे आयोजन करण्यात आले होते.शनिवार दि. 9 मार्च रोजी सायं 5 वाजता श्रींची पालखी मिरवणुक वाजत गाजत श्री पाटेश्वर मंदिराकडे प्रस्थान करील . श्री पाटेश्वर मंदिरातील भजनानंतर पालखीचे पारंपारिक राजमार्गाने मंदिरापाशी आगमन होईल. त्यानंतर मंदिराभोवती प्रदक्षिणाकरून व भजन करुन पालखीचे पुन्हा मंदिरात आगमन होईल. यावेळी महाआरती करण्यात येईल. त्यानंतर 9 वाजता
नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ मळगांव सावंतवाडी यांचा श्री संत सद् गुरु देवावतारी बाळुमामा हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग सादर होणार आहे.सोमवारी दि.11 मार्च रोजी श्रींची साप्ताहिक पालखी फेरी होईल.तर बुधवार दि. 13 मार्च रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत समाराधना होऊन या सोहळ्याची सांगता होणार आहे.