अपघातात जखमी निगुडेतील युवकांचे अखेर निधन
बांदा (प्रतिनिधी) दि ७ मार्च २०२४
निगुडे – गावठणवाडी येथील देवरथ काशीराम गावडे (वय ३४) याचे गुरुवारी पहाटे निधन झाले. रविवारी दुपारी बांदा येथे दुचाकीचा अपघात होऊन तो जखमी झाला होता. त्याच्यावर बांबोळी रुग्णालयात उपचार करण्यात आलेत. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, निगुडे येथे त्याच्या घरी बुधवारी रात्री त्याची प्रकृती ढासळली. स्थानिकांनी त्याला गुरुवारी पहाटे बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच त्याचे निधन झाले होते.
देवरथ हा बांदा उपसरपंच बाळू सावंत यांच्या कन्स्ट्रक्शनमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होता. अत्यंत प्रामाणिक, हुशार, कायम हसतमुख अशी त्याची बांदा परिसरात ओळख होती. त्याचा मित्रपरिवारही बराच मोठा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहिणी असा परिवार आहे.





