प्रकल्प सिंधुपुत्र’ अंतर्गत मच्छिमार युवकांना वाॅटरस्पोर्ट्स परवाने वितरण
कुडाळ (हेमंत मराठे) दि . १९ फेब्रुवारी २०२४
कोकणातील सामाजिक व आर्थिक शाश्वत विकास हेच मानव साधन विकास संस्थेचे ध्येय असे मत सौ. उमा प्रभू यांनी प्रकल्प सिंधुपुत्र’ अंतर्गत नुकताच मच्छिमार युवकांना वाॅटरस्पोर्ट्स परवाने वितरणाचा कार्यक्रमात व्यक्त केले.
‘मानव साधन विकास संस्था’ ही कोकणातील एक नामांकित सामाजिक संस्था. संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली ‘प्रकल्प सिंधुपुत्र’ अंतर्गत नुकताच मच्छिमार युवकांना वाॅटरस्पोर्ट्स परवाने वितरणाचा सोहळा संपन्न झाला.
कोकण किनारपट्टीचे सतत वृद्धिंगत होणारे पर्यटनमुल्य लक्षात घेवून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मच्छिमार युवकांसाठी मानव साधन विकास संस्था संचलित, परिवर्तन केंद्र-सिंधुदूर्ग आणि ‘आय. सी.आय. सी. आय. फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रकल्प सिंधुपुत्र’ हा उपजिविका निर्मितीक्षम कार्यक्रम आॅक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान राबविण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत ‘लाईफ सेव्हिंग टेक्निक्स्-वाॅटर स्पोर्टस्’ व
पाॅवर बोट हॅन्डलिंग (टिलर)’ चे निवडक ८७ मच्छिमार युवकांना प्रशिक्षण दिले गेले. यांत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १० सिंधुकन्यांनी प्रथमच आपले प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. सदरचे प्रशिक्षण भारतातील नामांकित ‘भारतीय पर्यटन अाणि यात्रा प्रबंध संस्थान’ अंतर्गत ‘राष्ट्रीय जलक्रीडा संस्थान-गोवा’ या पर्यटन मंत्रालय, भारत सरकार अधिकृत संस्थेमध्ये दिले गेले.
सिंधुपुत्र उपक्रमा अंतर्गत मासेमारी या पारंपारिक व्यवसायास पुरक म्हणून आर्थिक वृद्धीसाठी २०० मच्छिमार युवक युवतींना वाॅटर स्पोर्टस कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गेल्या २५ वर्षांत मानव साधन विकास संस्थेने, देशातील पहिली ‘ग्रामीण जनशिक्षण’ संस्था जन शिक्षण संस्थान-सिंधुदूर्ग, नवी मुंबईतील वंचित कामगारांच्या पाल्यांकरीता ‘उद्योजकता विकास संस्था’, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले ‘नर्सिंग स्कूल‘, ‘परिवर्तन केंद्र-प्रकल्प’, इत्यादींच्या माध्यमातून सिंधुदूर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांतील ९०,००० हून जास्त गरजूंना उपजिविकाक्षम प्रशिक्षण देवून उद्योग व रोजगारक्षम बनविले आहे.
मानव साधन विकास संस्था संचलित ‘परिवर्तन केंद्र’ संकल्पने च्या माध्यमातून सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील गरजू महिलांना २६०० शिवणयंत्रांचे वाटप, खेड्यांतील माध्यमिक शालेय विद्यार्थिनींसाठी २००० ‘सायकल बॅंक’, ‘मिशन व्हिजन’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी व चष्मे वाटप अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचा फायदा आतापर्यत लाखो लाभार्थ्यांना मिळाला आहे.
गावागावांतील परिवर्तन केंद्रांद्वारे लाखों महिला, शेतकरी, मच्छिमार, आर्थिकदृष्ट्या वंचित, माजी सैनिक व युवा, संस्थेशी जोडले गेले आहेत. परिवर्तन केंद्रांचे गाव पातळीवरील स्वयंसेवक कला, साहित्य, क्रिडा, आरोग्य, कृषी, उद्योग, अध्यात्म, संस्कृती अश्या विविध पातळ्यांवर आपला गाव समृद्ध करण्यासाठी तसेच आपले गाव आदर्श परिवर्तन केंद्रात रूपांतरीत करण्यासाठी उत्स्फुर्तपणे झटत आहेत. उदाहरणादाखल, संस्थेमार्फत काही वर्षांपूर्वी दिलेल्या वाॅटरस्पोर्टस् प्रशिक्षणाचा फायदा करून घेत आज मालवण (सिंधुदूर्ग) तालुक्यातील मच्छिमार युवक पर्यटन क्षेत्रात यशस्वीपणे करोडोंची उलाढाल करीत आहेत, त्यातूनच प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हजारो स्थानिकांना उद्योग व रोजगार निर्माण झाला आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, मालवण, देवगड हे तालुके वाॅटरस्पोर्टस् व्यवसायासाठी पोषक आहेत. सहकारातून सदर क्षेत्रात रोजगार निर्मिती सहज शक्य आहे. वरील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व वाॅटर स्पोर्टस परवाना वितरणाचा दिमाखदार सोहळा आरवली-सागरतिर्थ येथील ‘आराकिला’ या पंचतारांकित रिसाॅर्ट वर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना ‘कोकणातील सामाजिक व आर्थिक शाश्वत विकास हेच मानव साधन विकास संस्थेचे ध्येय आहे’ असे मत सौ. उमा प्रभू यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास मुख्य पाहुणे केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक, राष्ट्रीय सहकार धोरण समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभू, सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, नाबार्डचे अध्यक्ष शाजी के.व्ही., आय.सी.आय.सी.आय.चे प्रेसिडेंट संजय गुप्ता, फोमेंटो ग्रुपचे अवधुत तिमलो, सी.आय.आय.चे डाॅ. राजेश कपुर, लुपिन लिमिटेडचे सिताराम गुप्ता, संस्थेचे विश्वस्त सौ. अदिती सावंत, नाबार्डच्या रश्मी दरड, राष्ट्रीय जलक्रीडा संस्थानचे डाॅ. रविंद्र डोग्रा इ. व अन्य मान्यवर उपस्थित होते.





