मोंड येथे बीएसएनएल मोबाइल टॉवर मंजूर करा; ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे केली बीएसएनएलकडे मागणी
देवगड (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील मोंड येथे मोबाईल टॉवर नसल्याने येथील मोबाईल धारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. यासंदर्भात आमदार नितेश राणे यांचे लक्ष देखील येथील ग्रामस्थांनी वेधले होते. यदरम्यान आमदार नितेश राणे यांनी बीएसएनएल अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा केली. नुसार बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी मोंड येथे लवकरच मोबाईल टॉवर सुरू करू असे आश्वासित केले होते. त्यानुसार मोंड ग्रामपंचायतीच्या वतीने देवगड बीएसएनएल उपविभागीय कार्यालयात आज निवेदन देण्यात आले.
या निवेदनात ,देवगड तालुक्यातील मोंड येथे मोबाईल टॉवर मंजूर झाल्यास मोंड व पंचक्रोशीत गांवाना बीएसएनएलच्या मोबाईल सेवेचा मोठा फायदा होईल. यासंदर्भात काही महिन्यापूर्वी आमदार नितेश राणे यांचे सोबत आपले अधिकारी वर्गाची बैठक संपन्न झाली आहे. त्यावेळी आपण आश्वासित केल्याप्रमाणे आमचे गावातला मोबाईल टॉवर मंजूर करून पंचक्रोशीतील ग्रामस्थांची गैरसोय दूर करावे अशा आशयाचे निवेदन मोंड सरपंच शामल अनभवणे, उपसरपंच अभय बापट यांनी देवगड बीएसएनएल अभियंता श्री पायमोडे यांच्याकडे दिले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ वैशाली अनभवणे, प्रदीप कोयंडे व ग्रामस्थ रवींद्र अनभवणे आदी उपस्थित होते.





