कळसुलीतून होणाऱ्या खडी वाहतुकीसंदर्भात सचिन पारधीये यांनी वेधले तहसीलदारांचे लक्ष..!

कणकवली : मागील कित्येक वर्षांपासून कणकवली तालुक्यातील हळवल – शिरवळ – कळसुली मार्गावर खडी वाहतूक करणारे डंपर चालक भरधाव वेगाने वाहतूक करत असल्यासाने अनेक वर्षे या मार्गावर अपघात झाले. तरीही डंपर चे अतिवेग काही कमी होईना. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अनेकदा उपोषणे केली. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे कळसुली सरपंच सचिन पारधीये यांनी तहसीलदार आर. जे. पवार यांना निवेदन दिले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कळसुली गावामध्ये असलेले विविध स्टोन क्रशर व काळ्या दगडाच्या क्वारीवरुन दरदिवशी खडीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर डंपरद्वारे अन्य ठिकाणी करण्यात येते. मात्र सदर वाहतूक करणारे डंपरवर कोणत्याही प्रकारचे आच्छादन नसल्याने, डंपरचे मागाहून अथवा समोरुन येणारे अन्य वाहनधारक आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच रहिवाशी यांना डंपरमधून उडणाऱ्या धूळीचा त्रास होतो. तसेच डंपरमधून रस्त्यावर पडणाऱ्या खडीमूळे वाहने घसरुन अपघात झालेले आहेत. तर भविष्यात अपघात होऊन जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबत वारंवार आपण तहसीलदार यांचे लक्ष वेधूनही कोणतीही सकारात्मक कारवाई किंवा सूचना झालेली नाही. पुन्हा एकदा सदर प्रकारची तात्काळ नोंद घेवून, डंपर धारकांना आच्छादनाचा काटे – कोरपणे वापर करण्याबाबत तात्काळ आदेश देण्यात यावेत, अशी मागणी कळसुली सरपंच सचिन पारधीये यांनी कणकवली तहसीलदार श्री. पवार यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

कळसुली – हळवल – शिरवळ मार्गावरील खडी वाळू वाहतूक करणारे डंपरचालक हे मद्यप्राशन करून वाहने चालवित असल्याचेही निदर्शनास आले असून, वाहने चालवितांना कानामध्ये इअर- फोन, हेडफोन, मोबाईल वर संभाषण करत तसेच भरधाव वेगाने काही वाहनांना ओव्हरटेक देखील करण्याचा प्रयत्न करतात. मात्र काही वेळा ओव्हरटेक च्या नादात डंपर पलटी देखिल झालेले आहेत. तसेच काही खड़ी वाहतूक करणारे डंपर सुट्टीच्या दिवशी सुध्दा वाहतूक करत असतात.

हळवल मार्गावरील खडी वाहतूक करणाऱ्यांचे पास चेक करून कारवाई करा

कणकवली – हळवल- शिरवळ – कळसुली मार्गावर खडी वाहतुक करणारे डंपर चालक अधिकृत पास वापरतात की नाही ? याची देखील तहसीलदारांनी खात्री करणे गरजेचे आहे. मात्र खात्री करून शांत न बसता त्यावर योग्य वेळी, कायदेशीर मार्गाने कारवाई देखील होणे गरजेचे आहे.