येत्या १० दिवसात रोणापालपर्यंत कालव्यात पाणी न आल्यास आत्मदहन करणार ; मडुरा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा इशारा
बांदा (मंगल कामत)
तिलारी कालव्यातून रोणापाल गावापर्यंत तातडीने पाणी सोडण्याबाबत कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव यांच्या बरोबर झालेली चर्चा निष्फळ ठरली. पाण्याअभावी शेती बागायती मरून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाची दुरुस्तीची कामे शेतकऱ्यांसाठी की ठेकेदार व अधिकाऱ्यांसाठी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. २० जानेवारी पर्यंत कालव्यातून रोणापालपर्यंत पाणी न आल्यास सोमवार २२ जानेवारी रोजी तिलारी कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.
तिलारी कालव्यातून शेती बागायतीला भविष्यात पाणी मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी अल्प दरात या प्रकल्पासाठी जमिनी दिल्या. मात्र, ३५ वर्षांचा कालावधी लोटला तरीही पाणी मिळालेले नाही. गतवर्षी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर १ एप्रिल रोजी पाणी सोडण्यात आले होते. कालव्यातून पाणी अविरतपणे सुरू राहील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी नारळ, पोफळीसह अन्य नवीन लागवडी केल्या आहेत. मात्र, सध्या कालवा दुरुस्तीच्या नावाखाली कालव्यातून पाणीपुरवठा बंद असल्याने बागायतीना धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी बुधवारी तिलारी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली.
येत्या दहा दिवसात कालव्यातून पाणी रोणापाल पर्यंत येईल अशी व्यवस्था करा अशी मागणी माजी सरपंच सुरेश गावडे यांनी केली. मात्र दुरुस्तीची कामे सुरू असल्याने पाणी सोडण्यास अभियंता जाधव यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळे शेतकरी असंतप्त झालेत. तिलारी कालव्याचा अद्याप शेतकऱ्यांना फायदा झालेला नाही. मात्र ठेकेदार आणि अधिकारी मालामाल झाल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
गेल्या वर्षी रोणापाल पर्यंत पाणी आल्याने शेतकऱ्यांनी नवीन लागवडी केल्या. मग मध्येच पाणी बंद का करता ? असा सवाल उपस्थित केला. त्यावर गेल्यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर पाणी सोडण्यात आल्याचे अभियंता जाधव यांनी सांगताच शेतकरी संतप्त झाले. प्रायोगिक तत्त्वावर पाणी सोडण्यात आल्याची पुसटशी कल्पनाही शेतकऱ्यांना दिली नव्हती. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभाग जबाबदार राहील असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. शेतकरी आपल्या पाणी सोडण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने अभियंता जाधव हतबल झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
जानेवारी २० जानेवारी पर्यंत तिलारी कालव्यातून रोणापालपर्यंत पाणी न आल्यास सोमवार २२ रोजी सकाळी १० वाजता तिलारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय झाल्याची माहिती सुरेश गावडे यांनी दिली. यावेळी निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, मडूरा माजी ग्रा. पं. सदस्य प्रकाश वालावलकर, मळगाव माजी उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सागर गोठस्कर, अरुण पंडित आदी उपस्थित होते.
———–





