Big News – “काळजी घेण्याची गरज पण…!” ; कोरोनाच्या ‘जेएन.१’ उपप्रकाराबाबत ‘WHO’ चं स्पष्टीकरण.

185

जिनिव्हा : नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर जग कोरोनाच्या ‘जेएन.१’ या उपप्रकाराच्या पसरत चाललेल्या संसर्गामुळे पुन्हा धास्तावले आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘जेएन.१’ हा उपप्रकार चिंतेची बाब असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) नमूद केले आहे. अर्थात, काळजी घेण्याची गरज असली तरी सार्वजनिक आरोग्याला धोका कमी असल्याचा दिलासाही ‘डब्लूएचओ’ने दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, की कोरोनाच्या ‘जेएन.१’ या विषाणुची यापूर्वीच ‘बीए २.८६’ या प्रकारातील चिंता करण्यासारखा उपप्रकार म्हणून वर्गवारी करण्यात आली आहे. मात्र, अलीकडच्या काही आठवड्यांत अनेक देशांत ‘जेएन.१’ चे रूग्ण आढळत असून जगभरातच त्याचा संसर्ग वाढत आहे.

भारतातही केरळमध्ये या उपप्रकाराचा पहिला रूग्ण आढळला आहे. इन्फ्लूएंझा किंवा फ्लूसंदर्भातील सर्व डेटा शेअर करण्याच्या उपक्रमांतर्गत कोरोनाचा ‘जेएन.१’ हा विषाणू ‘बीए २.८६’ चा वंशज असल्याचे अहवाल देण्यात आले आहेत. वेगाने होणारा प्रसार पाहता त्याचा मूळ विषाणुव्यतिरिक्त चिंता करण्यासारखा उपप्रकार म्हणून स्वतंत्र वर्गीकरण करण्यात आले आहे, अशी माहितीही संघटनेने दिली आहे.

कोरोनाचा ‘जेएन.१’ हा उपप्रकार चिंतेची बाब असली तरी सध्या उपलब्ध असलेल्या मर्यादित पुराव्यानुसार या उपप्रकाराचा जागतिक आरोग्याला कमी धोका आहे, असा दिलासाही डब्लूएचआने दिला आहे. विशेषत: हिवाळ्याची सुरुवात झालेल्या देशांमध्ये या उपप्रकारामुळे सार्सच्या रुग्णांचे प्रमाण वाढू शकते. तसेच नेहमीच्या विषाणुजन्य व जिवाणुजन्य संसर्गातही वाढ होऊ शकते. भारतासह अमेरिका, चीन, सिंगापूर आदी देशांत या उपप्रकाराचे रुग्ण आढळले आहेत. सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांत थेट ७५ टक्के वाढू होऊन गेल्या आठवड्यात ५६,०४३ रुग्ण सापडले. भारतात आठ तारखेला केरळमध्ये जेएन.१ चा पहिला रुग्ण आढळला. तेथील ७९ वर्षीय महिलेला या उपप्रकाराचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले.